छत्रपती संभाजीनगर : पाच नद्या, १०८ किलोमीटरपर्यंतचे खोलीकरण व रुंदीकरण करण्यासह पात्रांमध्ये तब्बल ५४० विंधन विहिरी घेण्यासारखे काम सध्या बीड जिल्ह्याच्या चार तालुक्यांमध्ये युद्धपातळीवर सुरू आहे. खोलीकरण व रुंदीकरणाचे १०० किमीचे काम पूर्ण झालेले असून, आता अवघे आठ किमीचे काम बाकी आहे. यानंतर जुलैमध्ये पाचही नद्यांच्या दुतर्फा आणि अन्य सुमारे ५० पेक्षा अधिक गावांच्या शिवारांमधील शाळा, गायरान, मोकळ्या जागांवर २५ लाख वृक्षारोपणाची मोहीम हाती घेतली जाणार आहे.

मयंक गांधी यांच्या ‘ग्लोबल विकास ट्रस्ट’च्या माध्यमातून १६ जानेवारी २०२६ पासून सुरू झालेले वरील काम अवघ्या पाच महिन्यांत पूर्णत्वाला जात आहे. बीड जिल्हा दुष्काळी भाग म्हणून सर्वपरिचित आहे. यातील परळी, अंबाजोगाई, माजलगाव व धारूर या चार तालुक्यांमधील भूगर्भातील पाणीपातळी उंचावण्याचा एक प्रथमोपचार म्हणून सरस्वती, वान, पापनाशी, गुणवारा व लिंगी या पाच नद्यांचे खोलीकरण व रुंदीकरण करण्याचे काम ‘ग्लोबल विकास ट्रस्ट’कडून हाती घेण्यात आले. गतवर्षीही ६५ किलोमीटरचे हेच काम करण्यात आले होते. त्याचे सकारात्मक परिणाम दिसून आल्याने या वर्षीही कामाची व्याप्ती वाढवून १०८ किलोमीटरच्या अंतराने खोलीकरण व रुंदीकरण करण्याचा निर्णय घेतला असून, यामध्ये ४१ गावांनीही लोकवाटा संकलित केल्याची माहिती ट्रस्टकडून देण्यात आली.

जीआरए पद्धतीनुसार काम

भूगर्भातील पाणीपातळी वाढीचा दावा , नदीपात्रामध्ये जीआरए पद्धतीनुसार काम सुरू आहे. या पद्धतीतून कोट्यवधी लिटर पाणी जमिनीत मुरवले जाते. एका जीआरएमधून ८ कोटी लिटर पाणी मुरते. नदीपात्रात २०० मीटर अंतराने २०० फूट खोलीच्या विंधन विहीर घेतल्या जातात. बाजूलाच जाळी बसवून आसपास दहा-बाय-दहाचा खड्डा घेऊन त्यात दगड-वाळू भरली जाते. त्यामुळे पाण्याचा निचरा होऊन स्वच्छ पाणी भूगर्भात जाते. ३६४ कोटी ८० लक्ष कोटी लिटर पाण्याची साठवण क्षमता होणार असल्याचा दावा ट्रस्टकडून करण्यात आला.

चार तालुक्यांमध्ये काम

बीडमधील चार तालुक्यांमध्ये ट्रस्टकडून काम सुरू आहे. यामध्ये गावांचाही सहभाग असावा म्हणून ग्रामसभा घेऊन लोकवाटा जमा केला जातो. तो निधी बऱ्याच अंशी गावांच्याच विकासकामांमध्ये वापरला जातो. गतवर्षी केलेल्या कामांमधून ५०० फुटांवरची पाणीपातळी ७०-८० फुटांवर आली आहे. आता जुलैमध्ये २५ लाख वृक्षारोपणाचीही मोहीम हाती घेतली जात आहे.

  • मयंक गांधी, संस्थापक अध्यक्ष, ग्लोबल विकास ट्रस्ट वृक्षारोपणासाठी बैठक
    ग्लोबल विकास ट्रस्टचे अध्यक्ष मयंक गांधी यांच्या उपस्थितीत २५ लाख वृक्षारोपणासाठी वृक्षलागवड संवर्धन समिती, विविध सामाजिक संस्था, शाळा-महाविद्यालये, वृक्षप्रेमी व स्थानिक नागरिकांची बैठक आयोजित करून मोहिमेची रूपरेषा ठरवण्यात येणार आहे.
  • चेतन सौंदळे, सामाजिक कार्यकर्ते, परळी