छत्रपती संभाजीनगर – दहावीच्या परीक्षेदरम्यान गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी पंचायत समिती स्तरावरून ‘भरारी पथक’ आणि ‘बैठे पथक’ नियुक्त करण्याची प्रक्रिया सुरू असताना गटशिक्षणाधिकारी कार्यालयाकडून चार-पाच वर्षांपूर्वी निधन झालेल्या ग्रामसेवकाच्या नावाने आदेश निर्गमित झाल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार जुनी यादी जोडल्याने घडला, पण जुनी यादी समाजमाध्यमावर जाण्यापूर्वीच सुधार करून वरिष्ठांकडे पाठवण्यात आल्याचे स्पष्टीकरण गटशिक्षणाधिकारी समंदर खान यांनी दिले.
मिळालेल्या माहितीनुसार, बीड पंचायत समितीअंतर्गत कार्यरत असलेल्या ग्रामसेवक व इतर कर्मचाऱ्यांची नावे नमूद करून भरारी व बैठे पथकांची नियुक्ती करण्यात आली. मात्र, २०२१ साली आजारपणामुळे निधन झालेल्या ग्रामसेवक अरविंद आगलावे यांच्या नावाचाही समावेश आदेशात असल्याचे निदर्शनास आले. त्यांना बैठे पथकाची जबाबदारी दिल्याचा उल्लेख आदेशपत्रात असल्याचे सांगितले जाते.
या प्रकारामुळे कार्यालयीन कामकाजातील पडताळणी प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. संबंधित आदेश निर्गमित करताना अद्ययावत सेवाअभिलेखांची तपासणी करण्यात आली होती का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
याबाबत गटशिक्षणाधिकारी समंदर खान यांनी सांगितले की, जिल्हाधिकारी व मुख्यकार्यकारी अधिकारी कार्यालयास बैठे पथकाची यादी पाठवताना जुनी यादी जोडली गेली. परंतु गटशिक्षणाधिकारी कार्यालय स्तरावरच यादी पडताळणी केली असता त्यात मृत एका ग्रामसेवकाचे नाव असल्याचे लक्षात येताच त्यात सुधार करून नवी यादी पाठवण्यात आली.
