छत्रपती संभाजीनगर – वाहनांची कोणतीही प्रत्यक्ष तपासणी न करता, केवळ व्हॉट्सॲपवरून व्यवहार करून ऑनलाईन पद्धतीने वाहनांचे फिटनेस प्रमाणपत्र जारी करणाऱ्या एका मोठ्या आंतरराज्यीय सायबर घोटाळ्याचा बीडच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात तांत्रिक कौशल्याचा गैरवापर करून थेट राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्राच्या (एनआयसी) डेटाबेसमध्ये अनधिकृत फेरफार करणाऱ्या आशिष कडियान या मुख्य आरोपीला उत्तर प्रदेशातील नोएडा येथून अटक करण्यात आली आहे.
हा प्रकार बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात ९ जानेवारी २०२६ रोजी दाखल झालेल्या गुन्ह्याच्या तपासादरम्यान उघडकीस आला. या सायबर गुन्ह्याचे गांभीर्य आणि तांत्रिक गुंतागुंत लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय प्रशासकीय पोलीस अधिकारी वेंकटराम यांच्या नेतृत्वात ‘एसआयटी’ची स्थापना करण्यात आली होती. तपासात मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी आशिष कडियान हा एनआयसीएसआय अंतर्गत कंत्राटदार असलेल्या वेल्कोसीस सिस्टिम प्रा. लि. या कंपनीत सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून कार्यरत होता.
उपप्रादेशिक कार्यालयासंदर्भातील प्रणालीवर काम करत असल्याने त्याला या सॉफ्टवेअरच्या कोडिंगची सखोल माहिती होती. याच तांत्रिक माहितीचा गैरवापर करून त्याने एसक्यूएल इंजेक्शनसारख्या असुरक्षित तांत्रिक त्रुटींचा (बग्ज) वापर केला. त्याद्वारे एनआयसीच्या बॅकएंड डेटाबेसमध्ये प्रवेश मिळवून वाहनांचे फिटनेस स्टेटस बदलणे, व्यावसायिक वाहनांचा टॅक्स भरल्याच्या नोंदी करणे, सीएनजी स्टेटस बदलणे आणि ‘ब्लॅक लिस्ट’मधील (नॉट टू बी ट्रान्सफर्ड) वाहने अनधिकृतपणे बाहेर काढणे असे गंभीर फेरफार केल्याचा संशय आहे.
डेटाबेसमध्ये बदल केल्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी डेटाक्वेरी लॉग्स डिलीट करणे आणि एनआयसीचे सिक्युरिटी ऑडिट व ऑथेंटिकेशन बायपास करणे, अशा अत्यंत चलाखीने हा गुन्हा केला जात होता. सद्यस्थितीत आरोपीविरोधात भारतीय न्याय संहिता तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या (तंत्रज्ञान ॲक्ट) विविध गंभीर कलमांखाली कारवाई करण्यात आली असून, या घोटाळ्याची व्याप्ती आणखी किती वाहनांपर्यंत व इतर राज्यांपर्यंत पसरली आहे, याचा विशेष तपास पथकाकडून फॉरेन्सिक आणि तांत्रिक तपास सुरू आहे. या गुन्ह्यामध्ये अन्वये कारवाई करण्यात आली आहे.
एचएसआरपी प्लेटला फाटा
२०१९ पूर्वीच्या वाहनांवर एचएसआरपी नंबर प्लेट बसवण्याची मुदत १ जुलै होती. परंतु आता १ ऑगस्ट आलेला असतानाही बीडकरांनी एचएसआरपी नंबर प्लेट बसवून घेण्याकडे पाठ फिरवली असून, उपप्रादेशिक कार्यालयाकडून होणाऱ्या कारवायांचीही फारसी चर्चा सुरू नसल्पाचेही चित्र आहे.
