सामान्य परिस्थितीतील तरुणांचा आत्मविश्वास वाढला
वैद्यकीय पदवीचे शिक्षण पूर्ण करून डॉक्टर झालेल्या चार तरुणांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या माध्यमातून भारतीय प्रशासन सेवेत अधिकारी होण्याचे आपले स्वप्न पूर्ण केले. कोरेगाव येथील शेतकरी कुटुंबातील डॉ. किशोर तांदळे, चौसाळा येथील सुदर्शन लोढा, नेकनूर येथील विवेक भस्मे आणि आष्टी तालुक्यातील पिंप्री घुमरी येथील डॉ. संदीप देवीदास पांडुळे यांनी हे यश मिळवले. या चौघांच्या या यशामुळे सामान्य स्थितीत शिक्षण घेणाऱ्या तरुणांचा आत्मविश्वास वाढला आहे.
जिल्ह्यात मागील काही वर्षांपासून तरुणांमध्ये भारतीय प्रशासन सेवेत जाण्याचा कल वाढला आहे. दळणवळणाची अपुरी साधने, सुविधांची अबाळ आणि ग्रामीण भागात जि.प. सरकारी शाळांमधून कसेबसे मिळणारे प्राथमिक शिक्षण अशा स्थितीतही तरुणांनी केंद्रीय व राज्य लोकसेवा आयोगांच्या परीक्षेतून यश मिळवण्यास सुरुवात केली आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत जिल्ह्यातील तीन तरुणांनी यशाचा झेंडा रोवला.
केज तालुक्यातील कोरेगाव येथील शेतकरी तुकाराम तांदळे यांचा मुलगा डॉ. किशोर याने लहानपणापासूनच आयएएस होण्याचे स्वप्न उराशी बाळगले. केजच्या राजर्षी शाहू आणि स्वामी विवेकानंद विद्यालयातून प्राथमिक शिक्षण घेतलेल्या किशोरने औरंगाबादच्या एमजीएम महाविद्यालयात २०११ मध्ये वैद्यकीय पदवी प्राप्त केली. वैद्यकीय पदवी मिळाल्यानंतर लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी दिल्ली गाठली. दोन वर्षांपूर्वी स्पर्धा परीक्षेतून सीमा सुरक्षा दलात असिस्टंट कमांडर म्हणून निवडही झाली. मात्र, आयएएस व्हायचेय, या जिद्दीने नोकरी नाकारून त्याने अभ्यास सुरू ठेवला आणि नुकत्याच जाहीर झालेल्या परीक्षेत किशोरने यश मिळवले. बीड तालुक्यातील चौसाळा येथील व्यावसायिक दिलीप चांदमल लोढा यांचा मुलगा डॉ. सुदर्शन यानेही या परीक्षेतून आयएएस होण्याचे स्वप्न पूर्ण केले. सुदर्शन याचेही प्राथमिक शिक्षण शहरातील शाळेत झाल्यानंतर मुंबई येथील केईएम महाविद्यालयात वैद्यकीय पदवीचे शिक्षण पूर्ण केले. लहानपणापासूनच अधिकारी होण्याची इच्छा असलेल्या सुदर्शन याने यूपीएससी परीक्षेचा अभ्यास करून यश मिळवले.
नेकनूर येथील व्यापारी दत्तात्रय रामभाऊ भस्मे यांचा मुलगा डॉ. विवेक यानेही या परीक्षेतून भारतीय प्रशासन सेवेत अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण केले. डॉ. विवेक याचेही प्राथमिक शिक्षण जि.प. नेकनूर शाळेत झाल्यानंतर सोलापूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून वैद्यकीय पदवी प्राप्त केली. दोन वर्षांपूर्वी भारतीय राजस्व सेवेत केंद्रीय उत्पादन शुल्क विभागात सहायक आयुक्तपदी त्यांची निवड झाली. मात्र, आयएएस होण्याच्या जिद्दीने त्यांनी अभ्यास चालूच ठेवला आणि अखेर लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून यश मिळवले.
आष्टी तालुक्यातील पिंप्री घुमरी येथील डॉ. संदीप देवीदास पांडुळे यांनीही केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवले. वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून डॉक्टरी व्यवसाय करण्यात समाधान मानण्यापेक्षा जिल्ह्यातील चारही तरुणांनी जिद्द व मेहनतीने भारतीय प्रशासन सेवेत अधिकारी होण्याची इच्छा पूर्ण केली.
ग्रामीण भागात प्राथमिक शिक्षण घेतलेल्या तीनही तरुणांनी स्पर्धा परीक्षेत यश मिळवून सामान्य परिस्थितीत शिकणाऱ्या मुलांचा आत्मविश्वासच वाढवला आहे.