बीड– राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत शेतविहिरीच्या कामाचे देयक मंजूर करण्यासाठी ६१ हजार रुपयांची लाच मागून तडजोडीनंतर ६० हजार रुपये स्वीकारणार्‍या ग्रामरोजगार सेवकाला छत्रपती संभाजीनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवारी रंगेहात पकडले. मुकेश सोनाजी भोकरे (वय ४७), ग्रामरोजगार सहायक, लिंबारुई, असे लाच स्वीकारताना पकडण्यात आलेल्या कर्मचार्‍याचे नाव आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराने रोजगार हमी योजनेअंतर्गत शेतविहिरीचे काम केले होते. या कामाचे बिल मंजूर करण्यासाठी भोकरे याने तक्रारदाराकडे ६१ हजार रुपयांची लाच मागितली. याबाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर एसीबीच्या पथकाने पडताळणी केली. त्यानंतर तडजोडीअंती ६० हजार रुपये देण्याचे ठरले. ही लाचेची रक्कम स्वीकारत असताना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने भोकरे याला रंगेहाथ पकडले. या प्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई छत्रपती संभाजीनगर लाचलुचपत प्रतिबंधक अधीक्षक माधुरी कांगणे, अपर अधीक्षक शशिकांत शिंगारे आणि प्रभारी उपअधीक्षक प्रशांत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक बाळासाहेब शिंदे, पोलीस निरीक्षक भास्कर नवले, अनवेज शेख, प्रकाश डोंगरदिवे आणि रामेश्वर ताठे यांच्या पथकाने केली.

छत्रपती संभाजीनगर लाचलुचपत पथकाने बीड येथे सापळा रचला होता. यामध्ये तक्रारदाराकडून ५ लाख रुपयांच्या खऱ्या नोटा आणि उर्वरित ४० लाख रुपयांच्या बनावट (मनोरंजनाच्या) नोटा स्वीकारताना लखमावाड यांना त्यांच्या राहत्या घरी अटक करण्यात आली होती, याचा तपास चालू आहे.