छत्रपती संभाजीनगर : वाल्मिक कराडच्या अटकेपूर्वी बीड जिल्हा प्रशासनात सुरू असणारी अनागोंदी रो़खण्यासाठी अजित पवार यांच्याकडे बीडचे पालकमंत्री देण्यात आले. ते प्रशासनाला सरळ रेषेत आणत असताना त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. पुढे बीडचे पालकत्व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे आले. आता पालकमंत्री म्हणून त्या तशा फारशा बीडमध्ये आल्या नाहीत. आता बैठकाच्या तारखा ठरतात आणि त्या पुढे ढकलल्या जातात. परिणामी मीच खरी पालक आहे, असे आता पंकजा मुंडे जाहीरपणे सांगू लागल्या आहेत. अजित पवार यांच्या जयंतीनिमित्ताने बीडमध्ये हळहळ व्यक्त होताना ‘ काहीही म्हणा, बीडसाठी अजित पवारच हवे होते ’ अशी प्रतिक्रिया उमटू लागली आहे.सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि पार्थ पवार यांच्यातील वाद आणि सुनेत्रा पवार यांच्या भूमिका यावर बीड जिल्ह्यातील राजकीय नेत्यांचे बारीक लक्ष असते.

राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांनी मुंबईत दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. याची कल्पना खुद्द पक्षाच्या अध्यक्ष असलेल्या सुनेत्रा पवार यांनाच नव्हती. मागील काही महिन्यात पक्षाची ‘घडी’ विस्कटत जात असल्याचे आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. अशा राजकीय व्यापात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार अडकल्याने बीडमधील अनागोंदी दूर करण्याचे अजित पवार यांचे स्वप्न मात्र अजून ‘ नियोजना’च्या पातळीवरच असल्याचे दिसून येत आहे. पालकमंत्री झाल्यापासून महाराष्ट्र दिनाचा एक दिवसाचा अपवाद सोडला तर सुनेत्रा पवार बीड जिल्ह्यात आल्या नाहीत. चालू आर्थिक वर्षातील पहिलीच नियोजन समितीची बैठक पक्षाची घडी विस्कटत असल्याने पुढे ढकलण्यात आली. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीची तारीख निश्चित नसली तरी १९ जुलै रोजी बैठक होईल असे सांगण्यात येत होते. पण तेही विस्कटले.

चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्याच नियोजन समितीच्या बैठकीत सन २६ – २७ या चालू वर्षासाठी ६२३ कोटी रुपयांची नियोजन केले आहे. याच अनुषंगाने निधीचे नियोजन करण्यासाठी ही बैठक १८ किंवा १९ जुलै रोजी होणार होती. मात्र, मुंबईत ‘घड्याळाचे काटे’ कसे फिरतात या वर बीडचे पालकत्व ‘ ऑनलाईन ’च होते का, अशी चर्चा आता सुरू झाली आहे. बीडमध्ये नव्याने वाळू विक्री घोटाळा पुढे आला. यातील दोषी तहसीलदारावर सरकारने अद्यापि कारवाई केलेली नाही. तहसीलदारांचे ‘ राष्ट्रवादी ’ शी संधान असल्याचीही चर्चा आहे.

२७ जुलैला पालकमंत्री बीडला येणार

याबाबत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ॲड. राजेश्वर चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता चव्हाण म्हणाले की, २६ जुलै रोजी गेवराई येथे विकास कामाचे उद्घाटन करून पालकमंत्री बीड येथे मुक्कामी असणार आहेत. त्यानंतर २७ रोजी बीड शहरातील कंकालेश्वर मंदिराला भेट देऊन तेथे चालू असलेल्या विकास कामांची पाहणी करणार आहेत व नंतर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.