छत्रपती संभाजीनगर : विलास घुले मृत्यू प्रकरणात खासदार बजरंग सोनवणे यांच्या मुलास अडकवण्यासाठी कारागृहातून कट रचला गेला. यासाठी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याने कारागृहातून भ्रमणध्वनी वापरला असा आरोप खासदार सोनवणे यांनी केला होता. मात्र, हे सर्व आरोप कारागृह प्रशासनाने फेटाळले आहेत. यापूर्वी कारागृहातून दूरध्वनी केल्या प्रकरणात दोनदा चौकशी झाली होती. या चौकशीतही प्रशासनाची चूक झाली नव्हती, असा दावा कारागृह प्रशासनाकडून केला जात आहे.

कारागृह अधीक्षक रामराव चांदणे यांनी सांगितले. ते म्हणाले, की प्रत्येक कैद्यास दर आठवड्यास तीनदा १० मिनिटे तीन नातेवाईकांना बोलण्याची मूभा आहे. याला कारागृहाच्या भाषेत ‘ॲलन कॉल’ म्हटले जाते. कोणत्या तीन नातेवाईकांना बोलण्यास मूभा आहे, हे संबंधित पोलिसांकडून प्रमाणित करून घेतले जाते. जेव्हा कैद्याला दूरध्वनी दिला जातो तेव्हा त्यात प्रमाणित केलेले तीनच फोन क्रमांक दिसतात. या पलीकडे चौथा नंबर त्यात नसतो. ’ या तंत्रज्ञानामध्ये एक दोष असल्याचे अधिकारी सांगतात, नातेवाईकांनी संभाषण करताना जर कोणी ‘कॉन्फरन्सिंग’ केले तर मात्र कारागृह प्रशासनाला फारसे काही करता येत नव्हते. विलास घुले यांच्या मृत्यूनंतर जर दूरध्वनी झाला होता का, ते संभाषण कोणामध्ये झाले होते, हे कळेल. पण कॉन्फरन्सिंग केले गेले होते का, असे प्रश्न कायम आहेत. आता नव्या तंत्रज्ञानामुळे कॉन्फरन्सिंगचा लाभ घेता येत नाही. हे नवे तंत्रज्ञान ॲलन कंपनीने तयार केले आहे. म्हणून कैद्याच्या कॉलसाठी ‘ ॲलन कॉल ’ असा शब्दप्रयोग कारागृह परिसरात वापरला जातो. या कॉलमध्ये दोन ‘ व्हिडिओ कॉल ’ करण्याचीही मुभा आहे. याशिवाय एक ‘ व्हिडिओ कॉल’ कमी करुन नातेवाईकांशी भेट घेण्यासाठीही कारागृहात वेळ दिला जातो. कॉन्फरन्सिंगची सोय बंद असणारी ही यंत्रणा अद्याप सुरू झालेली नाही. या पूर्वीही दोन दूरध्वनी संभाषणे समाजमाध्यमांवर आली होती. त्याची चौकशीही झाली, यातून काहीही निष्पन्न झाले नाही.

वाल्मिक कराड भोवती किती कॅमेरे ?

बीडच्या कारागृहामध्ये २०६ सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. यातील १२ कॅमेरे हे वाल्मीक कराड याच्या कोठडीसमोर लावलेले आहेत. एका कोठडीत ५०-५५ कैदी आहेत. जर कोणी चोरून मोबाईल वापरत असेल तर तेही लक्षात आले असते. अन्य कैद्यांनी ओरड केली असती. पण तसे नाही. यामुळे कारागृहातून कट शिजला, या आरोपात तथ्य नाही, हे आरोप कारागृह प्रशासनाने फेटाळले आहेत. पण विलास घुले यांच्या मृत्यू नंतर कॉन्फरन्सिंगची सोय सुरू होती का, आता ती बंद झाली आहे का, हे प्रश्न अद्याप अनुत्तरीत आहेत.