बीड: संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अटकेतील आरोपी वाल्मिक कराड याने कारागृहात बेकायदा भ्रमणध्वनी वापरुन हत्या सारख्या गंभीर गुन्ह्यांचा कट रचला जात असल्याचा आरोप खासदार बजरंग सोनवणे यांनी केला. कट रचल्याच्या पुष्ठ्यार्थ प्रसार माध्यमांसमोर ध्वनीफितही ऐकवली. या प्रकरणात आक्रमक भूमिका घेत सोनवणे यांनी आता अप्पर पोलीस महासंचालक व कारागृह महानिरीक्षकांना पत्र लिहून बीड जिल्ह्याचे कारागृह अधीक्षक व संबंधित कर्मचाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

१ ऑक्टोबर रोजी खासदार बजरंग सोनवणे यांनी पत्रकार परिषद घेऊन कारागृहातून वाल्मीक कराड आणि सुग्रीव कराड या दोघांमधील संभाषण जाहीर केले होते. बीड जिल्हा कारागृहात बंदिस्त असलेला आरोपी वाल्मीक कराड हा कारगृहातून बाहेरील व्यक्तींच्या संपर्कात असल्याचे फोनवरील संवादातून स्पष्ट होत असल्याचे बजरंग साेनवणे यांनी सांगितले. या रेकॉर्डिंगमध्ये माझ्या मुलाला अडकवण्यासाठी वाल्मीक कराड प्रयत्न करत असल्याचा आरोप बजरंग सोनवणे यांनी केला.विलास घुले यांचा मृतदेह पोलीस ठाण्याच्या परिसरात ठेऊन आंदोलन करा, अशा सूचनाही दिल्या जात असल्याचे संभाषणातून स्पष्ट होत होते.

यापूर्वी ३ ऑगस्ट रोजी पत्र देऊन कारागृहातील अनागोंदी कारभाराची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली होती. मात्र, प्रशासनाकडून आजपर्यंत कोणतीही ठोस कारवाई किंवा समाधानकारक माहिती देण्यात आली नाही, असा आक्षेप खासदार सोनवणे यांनी घेतला आहे. दरम्यान या प्रकरणात वरिष्ठस्तरावरुन पूर्वी चौकशी झाली असल्याचा कारागृह प्रशासनाचा दावा आहे.

कारागृहाने आरोप फेटाळले

खासदार बजरंग सोनवणे यांनी प्रसारित केलेली ध्वनीफित समाज माध्यमांवर प्रसारित करत कारागृहातील कायदा व व्यवस्थेवर बजरंग सोनवणे यांनी प्रश्न उपस्थित केले होते. कारागृहाच्या संबधातील सर्व आरोप प्रशासनाच्या वतीने फेटाळण्यात आले. यासंबंधी कारागृह अधीक्षक राजाराम चांदणे यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले , की यापूर्वी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कारागृहाची चौकशी आणि पाहणी केलेली आहे.सर्व नियमांचे पालन जिल्हा कारागृहात केले जात आहे.