बीड– मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी बीडच्या जिल्हा कारागृहात असलेल्या वाल्मीक कराडला विशेष सुविधा देऊन बडदास्त ठेवली जात आहे, अशी तक्रार थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यापर्यंत करण्यात आली आहे. यासंदर्भाने खासदार बजरंग सोनवणे यांनी गृहमंत्री अमित शहा यांची नुकतीच दिल्लीत भेट घेतली. यानंतर संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी कारागृह महानिरीक्षकांना एक पत्र लिहिले असून, त्यात त्यांनीही कराडला विशेष सुविधा पुरवण्यात येत असल्याची तक्रार करून त्याला नागपूरला हलवण्याची मागणी केली आहे. या मागणीला पाठोपाठ संदेश प्रसृत करून खासदार सुप्रिया सुळे यांनी देशमुख यांना बळ पुरवल्याने बीडमधील सामाजिक वातावरण राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्या आगमनाच्या तोंडावर ढवळून निघाले आहे.
बीडमध्ये बुधवारपासून विलास घुले हत्याप्रकरणात त्यांच्या कुटुंबीयांनी सौरव सोनवणेच्या अटकेच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले. त्याच्या दोन दिवसांपूर्वी बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेटही घेतली होती. खासदार सोनवणे यांनी अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी धनंजय देशमुख यांनी वाल्मीक कराडला जिल्हा कारागृहात विशेष सुविधा पुरवल्या जात आहेत अशी तक्रार करणारे पत्र कारागृह महानिरीक्षकांना पाठवले आहेत. याच प्रकरणी खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून वाल्मीक कराडला बीडच्या कारागृहातून नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात पाठवण्याच्या मागणीला बळ दिल्याची चर्चा सुरू ` झाली आहे. .
धनंजय देशमुख यांनी कारागृह महानिरीक्षक यांना लिहिलेल्या पत्रात अनेक बाबींचा उल्लेख केला आहे. वाल्मिक कराड इतर कैद्यांच्या नावावरून आणि वकिलांच्या सिमकार्डद्वारे बाहेरील व्यक्तींशी संपर्क साधणे, दुपारच्या बंदीच्या काळात अधीक्षक कार्यालयात बसवून नियमबाह्य पद्धतीने व्हिडिओ कॉल सुविधा पुरविणे, बराक क्र. ९ नजीकच्या फोनजवळ सीसीटीव्ही कॅमेरा नसणे आणि कारागृहातूनच बीडमधील परिस्थितीवर प्रभाव टाकून इतर आरोपींच्या मदतीने दहशत निर्माण करणे आदी मुद्दे नमूद आहेत. दरम्यान यावर आता राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील द्विट करत मोठी मागणी केली आहे.
कारागृह अधिकारी व कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करा- सुळे
धनंजय देशमुखांच्या पत्रानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, वाल्मीक कराडची बीड कारागृहातून नागपूर मध्यवर्ती कारागृहात रवानगी करावी. बीड कारागृहातील सीसीटीव्ही फुटेज, कॉल लॉग आणि भेट नोंदवही जप्त करून वरिष्ठ स्तरावर चौकशी व्हावी. आरोपीला मदत करणाऱ्या संबंधित कारागृह अधिकारी व कर्मचाऱ्यांवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करावेत. पीडित देशमुख कुटुंबाला न्याय मिळणे याला आमचे प्राधान्य असून आम्ही यासाठी आग्रही आहोत.
सामाजिक वातावरण ढवळले
बीडमधील सामाजिक वातावरण पुन्हा ढवळून निघाले आहे. खासदार बजरंग सोनवणे यांचे पुत्र सौरव यांच्या अटकेसाठी मृत विलास घुले यांच्या कुटुंबीयांनी उपोषण सुरू केले. तर वाल्मीक कराडची कारागृहात बडदास्त ठेवली जात असल्याची तक्रार खासदार सुप्रिया सुळे, बजरंग सोनवणे व धनंजय देशमुख यांनी केली आहे. यातून पुन्हा एकदा मराठा विरुद्ध वंजारी, संघर्षाच्या शक्यतेने वातावरण ढवळून निघाले आहे.
