छत्रपती संभाजीनगर – विद्युत तार चोरी करण्याच्या प्रयत्नात मनोराच कोसळल्याने दोघांचा मृत्यू झाला. मात्र, मृतांच्या साथीदारांनी अपघाताचा बनाव रचून मृतदेह परभणीला नेले. मात्र, परभणीत या घटनेचा उलगडा झाल्याने खरा प्रकार समोर आला. ही घटना केज तालुक्यातील नांदूरघाट शिवारात शनिवारी घडली असून, सोमवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला.

अविनाश पाटोळे व आकाश आडे, अशी मृतांची नावे आहेत. हे दोघेही जागीच ठार झाले होते. शनिवारी मृत दोघेही अतिउच्चदाबाची वाहिनी गेलेल्या विद्युत मनोऱ्यावर चढले होते. त्यांनी तारा कापण्याचे काम सुरू केले. मात्र, मध्येच मनोराच कोसळला. यामध्ये पाटोळे व आडे हे दोघे जागीच ठार झाले. त्यांचे साथीदार मात्र, या घटनेने घाबरले. त्यांनी या घटनेला अपघाताचे स्वरुप देण्याचा प्रयत्न केला.

दोन्ही मृतदेह कारमध्ये ठेवून परभणीकडे पलायन केले. परभणीत वाहनाच्या चालकाने रुग्णवाहिकेतून मृतदेह रुग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती मृतांच्या कुटुंबीयांना मिळाल्यानंतर त्यांनी चौकशीची मागणी केली. पोलिसांना ही माहिती देण्यात आली. परभणी व केज पोलिसांनी नांदूरघाट शिवाराला भेट देऊन पंचनामा केला.

दरम्यान, या घटनेतून अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. उच्चदाबाची वीज वाहून नेणाऱ्या वाहिन्यांसाठी उभारण्यात आलेला विद्युत मनोरा तसा मजबूत असतो. परंतु हा मनोरा कोसळतो कसा, याची जबाबदारी कोणाची, कोसळलेल्या मनोऱ्याच्या घटनेची चौकशी होईल का, असे काही प्रश्न उपस्थित झाले आहेत. यापूर्वी केजमध्ये मनोरा कोसळण्याची घटना यापूर्वी कधी अलिकडच्या काळात घडलेल्याचे उदाहरण समोर आले नाही.