बीड : दिवंगत माजी खासदार केशर काकू क्षीरसागर यांच्या पुण्यतिथीनिमित्त होणाऱ्या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवरून नव्या वादाला तोंड फुटले आहे. २० व्या पुण्यतिथी समारोह कार्यक्रमाच्या पत्रिकेमध्ये सामाजिक एकोपा बिघडवणाऱ्या व्यक्तीचे नाव टाकण्यात आले आहे व त्यास आक्षेप आहे, असे सांगत संदीप क्षीरसागर यांनी आता कार्यक्रमास हजर राहणार नाही, असे समाज माध्यमांतून जाहीर केले आहे. निमंत्रण पत्रिकेमध्ये परळीचे आमदार धनंजय मुंडे यांचे नाव आहे.
बीड येथे रविवारी ४ ऑक्टोबर रोजी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास क्षीरसागर काका-पुतणे दहा वर्षांनी एकत्र येतील, अशी चर्चा सुरू झाली होती. कार्यक्रमासाठी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी अनेक मान्यवरांबरोबर बीड जिल्ह्यातील आमदारांनाही निमंत्रित केले आहे. परंतु या कार्यक्रम पत्रिकेवरून आता आमदार संदीप क्षीरसागर यांनी आक्षेप घेतला आहे. राजकारण विरहित कुटुंब एकत्र येणार म्हणून आनंद होता. मात्र, सामाजिक एकोपा बिघडवणाऱ्या एका व्यक्तीचे नाव कार्यक्रम पत्रिकेत वाचले आणि कार्यक्रमाला न जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता सामाजिक एकोपा बिघडवणारी व्यक्ती नेमकी कोणती, असा प्रश्न विचारला जात आहे. काही काळ पाठीमागे वळून पाहिले तर प्रामुख्याने संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर संदीप क्षीरसागर आणि आमदार धनंजय मुंडे यांच्यातील राजकीय संघर्ष अधिक उघडपणे दिसून येत आहे. वर्षभरापूर्वी संदीप क्षीरसागर यांच्या जवळच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात धनंजय मुंडे यांनी प्रचंड आक्रमक भूमिका घेत संदीप क्षीरसागर यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यामुळे आमदार क्षीरसागर यांचा रोख धनंजय मुंडे यांच्याकडेच असल्याचा दावा संदीप यांचे समर्थक करत आहेत.
मागील काही दिवसांपासून काका माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर व पुतण्या आमदार संदीप क्षीरसागर यांच्यातील अंतर्गत कलह दूर झाला असून लवकरच हे दोघेही राजकीय मतभेद बाजूला सारून एकत्र येतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांकडून समाज माध्यमांवर तसा मजकूरही लिहिला जात असे. दिवंगत केशर काकू क्षीरसागर यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त हे दोघेजण एकत्र येतील, असे सांगण्यात येत होते. यास आता परळीचे ग्रहण लागले असल्याची चर्चा रंगली आहे.
दहा वर्षांपूर्वी निर्माण झाला होता दुरावा
काका जयदत्त क्षीरसागर व भारतभूषण क्षीरसागर यांना राजकीय आव्हान देत संदीप क्षीरसागर यांनी २०१६ मध्ये काकू-नाना विकास आघाडीची स्थापना करून नगरपालिका निवडणूक स्वबळावर लढली. यानंतर पाठोपाठ झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतही संदीप क्षीरसागर स्वबळावर लढले आणि मोठ्या प्रमाणात त्यांचे सदस्य निवडून आले. नगरपालिकेचे वीस, जिल्हा परिषदेचे तीन आणि पंचायत समितीचे आठ सदस्य संदीप क्षीरसागर यांचे समर्थक होते. २०१९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत पुतण्या संदीप क्षीरसागर यांनी थेट जयदत्त क्षीरसागर यांना पराभूत केले. हा पराभव जयदत्त क्षीरसागर यांच्या जिव्हारी लागला होता. जयदत्त क्षीरसागर यांच्या पराभवानंतर काका-पुतणे आता कधीच एकत्र येणार नाहीत, असे सर्वांचे मत होते. मात्र, या दोघांमध्ये मोठ्या प्रमाणात मनोमीलन होत असल्याचा दावा केला जात होता. बीड मतदारसंघात क्षीरसागर हे आडनाव टिकवून ठेवण्यासाठी एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही, हे जाणून लवकरच काका-पुतणे जिल्ह्यात एकत्र पाहायला मिळतील अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. काकूंच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम हे त्याचे निमित्त असेल असे सांगण्यात येत होते. मात्र, सामाजिक एकोपा नष्ट करणारे नाव पत्रिकेत असल्याचे कारण देत आता कार्यक्रमास जाणार नाही, असे आमदार संदीप क्षीरसागर यांनी म्हटले आहे.
