छत्रपती संभाजीनगर : बीड जिल्ह्यातील जायकवाडी भूसंपादन घोटाळयात तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना अटक करण्यात आली आहे. बीड जिल्ह्यात भूसंपादनाच्या कामात बनावट सह्या वापरुन जुन्या तारखेत भूसंपादनाचे सुमारे ७२ कोटी रुपये अदा करण्यात आले होते. तर सुमारे २४१ कोटी ६२ रुपयांचे घोटाळा जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी उघडकीस आणला होता. या प्रकरणात अविनाश पाठक यांच्या स्वाक्षरीचे नमुनेही तपासणीस पाठविले होते. भारतीय प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यास अटक झाल्याने खळबळ उडाली आहे.

बीड जिल्ह्यातील या भूसंपादन घोटाळ्यात काही कर्मचाऱ्यांचे व्हॉटस् ॲप वरील संभाषण आणि बनावट सह्यांचे नमुने गोळा करुन दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याच्या तपासात अविनाश पाठक यांचाही सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनी अविनाश पाठक यांना लातूर येथून अटक केल्याचे सांगण्यात आले. पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत हे सध्या रजेवर आहेत. अतिरिक्त पोलीस अधिकारी सचिन पांडकर यांनी अविनाश पाठक यांना ताब्यात घेतल्याच्या वृत्तास दुजोरा दिला. दरम्यान या प्रकरणात पूर्वी दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास एम व्यंकटराम यांच्या मार्गदर्शनाााली सुरू होता.

२४१ कोटीचा वाढीव मोबदल्याचा घोटाळा

बीड जिल्ह्यातील कोट्यावधी रुपयाच्या भूसंपादन घोटाळा प्रकरणी बिडमध्ये गुन्हा दाखल झाला होता.बीड मधील वरिष्ठ भूसंपादन कार्यालयाच्या १५४ प्रकरणात जवळपास २४१ कोटी ६२ लक्ष रुपये वाढीव मोबदल्याचे बनावट आदेश तयार करण्यात आले होते . या प्रकरणी तपास करण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून एक विशेष तपास स्थापन करण्यात आली होती. या पथकाने बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस देण्यात आली होती. दरम्यान शुक्रवारी तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक पोलिसांच्या चौकशी समिती पुढे हजर झाले .

सुमारे तीन तास चौकशी झाली असून यावेळी पोलिसांनी पाठक यांच्या स्वाक्षरीचे नमुने घेतले असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी दिली. जिल्हाधिकारी पाठक यांच्या सह्यांचे नमुने हस्ताक्षर तज्ज्ञांकडे पाठवण्यात येऊन तपासणीही केली. या घोटाळा संदर्भात गुन्ह्याचा तपास करण्यासाठी अविनाश पाठक यांना चौकशीच्या वेळी जबाब नोंदवण्यासाठी एक प्रश्नावली दिली असून. या प्रश्नावलीचे उत्तर देण्यासाठी अविनाश पाठक यांनी मागून घेतला होता. या घोटाळ्यात तत्कालीन जिल्हाधिकरी पाठक यांचे नाव, पदनाम व स्वाक्षरी करून दि. १ मार्च २०२५ ते १७ एप्रिल २०२५ पर्यंतच्या १५४ बनावट आदेश निर्गमित करण्यात आले होते. यातील सर्व कागदपत्रे, दूरध्वनीवरील संभाषणासह, सर्व संचिका पोलिसांनी यापूर्वीच ताब्यात घेतल्या होत्या.

विवेक जॉन्सन यांनी उघडकीस आणले प्रकरण

जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी जायकवाडी भूसंपादन कार्यालयास भेट दिल्यानंतर जुन्या तारखेतील आदेश मंजूर होत असल्याचे त्यांना दिसून आले. या अनुषंगाने कर्मचाऱ्यांचे संभाषण समोर आल्यानंतर त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती. यात ४० लवाद होतील, असे संभाषणही होते. या आधारे परळी तहसील कार्यालयातील प्रमुख अधिकारी संजय हंगे, कंत्राटी कर्मचारी अविनाश चव्हाण , जायकवाडीच्या भूसंपादन कार्यालयातील कंत्राटी तत्वावर काम करणारा शेख अजहर शेख बाबू, सेवानिवृत्त कर्मचारी त्र्यंबक पिंगळे, पांडुरंग पाटील, यासह काही कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले होते.

गुन्हा दाखल झाल्यानंतर तपासात अविनाश पाठक यांचाही सहभाग असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांची चौकशी करण्यात आली. आता या प्रकरणी त्यांना ताब्यात घेतले असून लातूरहून त्यांना बीडमध्ये आणण्यासाठी रिमांडची मागणी करण्यात आली आहे.