बीड – विलास घुले खून प्रकरणात मुलाला जाणीवपूर्वक अडकवण्यासाठी तुरुंगातून कट रचण्यात आला असल्याचा आरोप गुरुवारी खासदार बजरंग सोनवणे यांनी पत्रकार परिषदेत केला. याप्रकरणी संबंधित दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी खासदार बजरंग सोनवणे यांनी केली.

विलास घुले खून प्रकरणात मला आणि माझ्या मुलाला जाणीवपूर्वक गोवून बदनाम करण्याचा मोठा कट रचण्यात आला होता, असा दावा खासदार बजरंग सोनवणे यांनी केला. घुले खून प्रकरणातील पहिल्या फिर्यादीत माझ्या मुलाचे नाव अजिबात नव्हते. परंतु, मुलाचे नाव या प्रकरणात गोवण्यासाठी पूर्वनियोजित कट रचण्यात आला. यादरम्यान मृतदेह पोलीस ठाण्यात ठेवण्यात आला आणि त्यानंतर सभागृहात आमदारांनी वक्तव्य केले. हा संपूर्ण कट कसा रचला गेला, याचे सत्य आता ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या समोर आणणार आहे, असे त्यांनी सांगितले.

या प्रकरणात खोटी ॲट्रॉसिटी दाखल करायला लावल्याचा दावाही त्यांनी केला. खासदार सोनवणे म्हणाले, “पोलीस अधीक्षक रात्री १० वाजेपर्यंत ‘सौरव सोनवणेचा या प्रकरणात काहीही संबंध नाही’ असे म्हणतात, मग १० नंतर नेमका काय दबाव आला, की पुरवणी जबाबात नाव घेण्यात आले?”

“माझ्या मुलाला अडकवण्याचा कट रचला गेला आहे. मी याबाबत अधिकृत पत्र देणार असून, वाल्मीक कराड, रमेश घुले आणि सुग्रीव कराड यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी बजरंग सोनवणे यांनी केली.