बीड – महाराष्ट्र काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबद्दल ‘गुंगी गुडिया’ असा मजकूर समाज माध्यमाद्वारे प्रसारित करण्यात आल्यानंतर राज्यभर राष्ट्रवादी काँग्रेसकडून (अजित पवार) आक्रमकपणे आंदोलने सुरू झालेली असताना बीडमध्ये मात्र, आंदोलनाचा आवाज काहीसा क्षीण आढळून आल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. चारच दिवसांपूर्वी पालकमंत्री सुनेत्रा पवार या दोन दिवसांच्या जिल्ह्याच्या दौऱ्यावर येऊन गेल्यानंतरही आंदोलनाचा आवाज फारसा घुमला नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.

बीड जिल्हा अखंडित राष्ट्रवादी काँग्रेसचा एकेकाळी बालेकिल्ला राहिलेला आहे. अलिकडच्या विधानसभा निवडणुकीतही परळी, माजलगाव व गेवराई मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) अनुक्रमे धनंजय मुंडे, प्रकाश सोळंके व विजयसिंह पंडित, असे तीन आमदार निवडून आलेले आहेत. तर परळी, धारूर, बीड या तीन शहरांमधून लोकांमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे नगराध्यक्ष निवडून आलेले आहेत. बीडचे पालकमंत्रीपद राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे सोपवण्यात आले होते. मात्र, अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर उपमुख्यमंत्रीपदासह बीडचे पालकमंत्रीपदही सुनेत्रा पवार यांना देण्यात आले.

सुनेत्रा पवार या चारच दिवसांपूर्वी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्यानंतर त्यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदने सादर करण्यासाठी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी उसळली होती. अनेक जण छायाचित्रेही काढण्यासाठी धडपड करताना दिसत होते. मात्र, सुनेत्रा पवार यांच्याविषयी ‘गुंडी गुडिया’ म्हणून टीका झाल्यानंतरही इतर जिल्ह्यांत पडसाद उमटले. मात्र, बीडमध्ये आंदोलनाचा आवाज काहीसा क्षीण राहिल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.
बीडमधील केज, अंबाजोगाई, परळी हे तीन तालुके वगळता कोठेही राष्ट्रवादी काँग्रेसकडून मोठ्या प्रमाणात आंदोलन झाले नाही.

बीडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन झाले, मात्र ते आंदोलन पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या काही समर्थकांनी केले होते. परळीमध्ये सायंकाळी ४ नंतर कार्यकर्ते जमण्यास सुरुवात झाली होती. काही नेत्यांनी केवळ प्रसिद्धीपत्रक काढून आपला निषेध नोंदवला. गेवराई, बीड, माजलगाव, वडवणी, धारूर, पाटोदा, शिरूर आणि आष्टी तालुक्यात मोठ्या प्रमाणात निदर्शने अथवा निषेध करण्यात आल्याचे चित्र पुढे आले नाही.

बीडच प्रकरण पेटण्याला निमित्त

‘गुंगी गुडिया ’ या टीकेची सुरुवात होण्यास बीड जिल्ह्यातील पत्रकार बैठक कारणीभूत ठरली. बीड जिल्हा नियोजन आराखड्याच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना आमदार मुंडे यांनी प्रश्न विचारणाऱ्या पत्रकाराला दटावले. तो प्रश्न कायदा व सुव्यवस्थेशी संबंधित होता. मात्र, प्रश्नच विचारू दिला गेला नाही. यावरुन कॉग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी गुंगी गुडिया अशी टीका केली. पुढे धनंजय मुंडे यांनी स्पष्टीकरणही दिले.

‘‘ राष्ट्रवादी काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष या नात्याने मी व माझ्या सहकाऱ्यांनी काँग्रेस पक्षाचा निषेध करण्यासाठी केज येथे मोठे निदर्शने केले. जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांना सुनेत्रा पवार यांच्या बद्दल केलेल्या वक्तव्याचा लोकशाही मार्गाने निषेध करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. राजेश्वर चव्हाण, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार).