बीड : परळी तालुक्यातील वैद्यानाथ फिजिओथेरपी महाविद्यालयात उत्तरे न देणाऱ्या विद्यार्थीस वर्गात उभे केल्याचा राग धरुन मुलीच्या नातेवाईकांनी प्राध्यापकास मारहाण केली. हा प्रकार महाविद्यालयातील कॅमेऱ्यांमध्ये चित्रित झाला आहे. मारहाण झालेल्या प्राध्यापकाचे नाव डॉ. जहीर अहमत असे आहे.
अध्यापन करताना डॉ. जहीर अहेमद यांनी वर्गात विद्यार्थ्यांना काही प्रश्न विचारले होते. काही प्रश्नांची उत्तरे न दिल्याने एका विद्यार्थिनीला वर्गात उभे राहण्यास सांगितले. यानंतर संबंधित विद्यार्थिनीने याबाबत घरी माहिती दिली. त्यानंतर या विद्यार्थिनीच्या कुटुंबातील काही व्यक्तींनी थेट महाविद्यालयात येऊन प्राध्यापकाला मारहाण केली . मंचक गिते आणि शुभम गिते अशी आरोपींची नावे आहेत. हे या विद्यार्थीने भाऊ आहेत. या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर महाविद्यालयातील विद्यार्थी आक्रमक झाले. प्राध्यापकांची बाजू घेत विद्यार्थ्यांनी परळी शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली. प्राध्यापकाने दिलेल्या तक्रारीनंतर गुन्हा नोंद करण्यात आला.
मागील काही महिन्यात परळी तालुक्यातील गुन्हेगारीचा आलेख वाढत आहे. काही दिवसांपूर्वीच रेल्वे स्थानकावर एका जवानाने महिलेची छेड काढली होती. त्याचबरोबर छेडछाड, गंभीर जखमी करणे अशा घटनादेखील परळी तालुक्यात वाढताना दिसून येतात.
