छत्रपती संभाजीनगर : समुद्रातील व्हेल माशाच्या उलटीचा (अंबर ग्रीस) औषधनिर्मिती व सुगंधी अत्तर तयार करण्यासाठी वापर होतो. याच व्हेल माशाची उलटी विक्रीसाठी घेऊन जात असल्याच्या प्राथमिक माहितीवरून दोघांवर बीड पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी कारवाई केली. या कारवाईत जप्त करण्यात आलेल्या उलटीची किंमत आंतरराष्ट्रीय स्तरावर सुमारे दीड कोटी रुपये असल्याचे सांगितले जात असले तरी ही उलटी म्हणजे व्हेल माशाचे अंबर ग्रीसच आहे, यावर शिक्कामोर्तब व्हायचे बाकी असल्याची माहिती बीड पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून सांगण्यात आले.
बीड शहरातील चऱ्हाटा फाटा येथून एका कारमध्ये व्हेल माशाची उलटी घेऊन जात असल्याची माहिती शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रवीणकुमार बांगर यांच्या पथकाला मिळाली. बांगर यांच्या पथकाने परिसरातील एका हॉटेलजवळ सापळा रचून केलेल्या कारवाईत दीडकोटी रुपयांच्या जवळपास किमतीचा मुद्देमाल जप्त केला. व्हेल माशाची उलटी सोन्यापेक्षाही महाग समजल्या जाते. या अंबर ग्रीसची विक्री करणारे दोघे बीड शहरात येत असल्याची गोपनीय माहिती शिवाजीनगर पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी सांगितले की, व्हेल माशाच्या कोणत्याही अवयवाचा किंवा उत्पादनाचा व्यापारी वापर करणे गुन्हा आहे. व्हेल मासा शारीरिक प्रक्रियेतून जी उलटी करतो, ती द्रव स्वरूपात असते. या उलटीला ‘अंबर ग्रीस’ असे म्हटले जाते. औषधनिर्मिती, तसेच अत्तरनिर्मितीमध्ये एक खूप महत्त्वाचा घटक म्हणून अंबर ग्रीसचा वापर केला जातो.
या कारवाईत शैलेंद्र प्रभाकर शिंदे (वय ३८, रा. पिंपरी, ता. हवेली, पुणे) आणि विकास भीमराव मुळे (३०, रा. शिखरवाडी, पो. पारनेर, ता. पाटोदा) या दोघांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी या दोघांकडून दीड किलोच्या जवळपास वजनाची व्हेल माशाची उलटी (अंबर ग्रीस) जप्त केली आहे, ज्याची अंदाजित किंमत दीड कोटी रुपयांच्या जवळपास आहे.
या उलटीची वनविभागाकडून प्राथमिक तपासणी करण्यात आली असून, पुढील तपासणीसाठी ती आता छत्रपती संभाजीनगर येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आल्याचे पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून सांगण्यात आले. अशा प्रकरणात पहिल्यांदाच मोठी कारवाई बीड जिल्ह्यात झाल्याचा दावा केला जात आहे. पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार बांगर यांच्या पथकात किशोर पवार, उपनिरीक्षक माधव काटकर, सागर सौन्ने, बलराज सुतार, रवी आघाव, ज्ञानेश्वर मराडे, बाळू रहाडे, दिलीप राठोड, धनंजय येवले, विलास कांदे, अनिल आसेराव, अशोक राडकर, अनिल घटमळ आदींचा समावेश होता.

