छत्रपती संभाजीनगर – माजलगाव येथील ठाण्यात नियुक्त असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने बुधवारी सकाळी बीडमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. घटनास्थळी सध्या पंचनामा सुरू असून, तक्रार दाखल झाल्यानंतरच आत्महत्येमागचे कारण समोर येईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

बाळकृष्ण जायेभाय (वय ४२), असे आत्महत्या केलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असल्याची माहिती पोलीस अधीक्षक कार्यालयातून देण्यात आली आहे. बाळकृष्ण जायभाये यांनी राहत्या घरी गळफास घेतल्याचे सांगण्यात आले. जायभाये हे नगर रोडवरील समर्थ मंगल कार्यालयाच्या मागील बाजूस असलेल्या लोकाशानगर परिसरात राहतात.बाळकृष्ण जायभाय हे सध्या माजलगाव शहर पोलीस ठाण्यात कार्यरत होते. त्यांनी आत्महत्या का केली यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

जायभाय हे माजलगाव ठाण्यात नियुक्त होण्यापूर्वी बीड स्थानिक गुन्हे शाखा तसेच गेवराई पोलीस ठाण्यात कर्तव्य बजावले होते. यामुळे ते बीड जिल्ह्यात सर्वतो परिचित होते. पोलीस दलामध्ये कर्तव्यदक्ष कर्मचारी म्हणूनही त्यांची ओळख होती. मात्र त्यांनी अचानकपणे आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले असावे, यावर तर्कवितर्क लढवले जात आहेत. बाळकृष्ण यांच्या आत्महत्येमुळे पोलीस दलात व परिसरात खळबळ उडाली आहे. आहे.

दरम्यान, मृतदेह शवविच्छेदनासाठी बीड येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास शिवाजीनगर पोलीस करत आहेत.बीडमधील एका निलंबित पोलीस निरीक्षकाने गतवर्षात अंबाजोगाईत राहत्या घरात आत्महत्या केली होती. पोलीस दलात वर्षभराच्या आतच ही दुसरी घटना घडल्याने अस्वस्थता पसरली आहे.