छत्रपती संभाजीनगर – जागतिक स्तरावरील युद्धजन्य परिस्थिती पाहता सर्वसामान्यांचे जेवण असलेल्या गॅस सिलिंडरची सर्वत्रच तीव्र टंचाई जाणवत आहे. अशा सर्वसामान्यांशी संबंधित जीवन जगण्याशी संबंधित आवश्यक वस्तू, कागदपत्रांच्या नावाखाली सायबर गुन्हेगारांनी आतापर्यंत अनेकांची फसवणूक केली असून, एखाद्या परिस्थितीचा फायदा घेण्याची त्यांची कार्यपद्धती (मोडस ऑपरेंटी) राहिली आहे.

सायबर गुन्हेगारांचा इतिहास पाहता सिलिंडरच्या टंचाईच्या काळात ते सक्रीय होऊन ‘मी गॅस कंपनीचा अधिकारी बोलतोय… तुमच्या गॅस सिलिंडरच्या वितरणामध्ये एक तांत्रिक अडचण निर्माण झाली असून, अमूक एवढी रक्कम तमूक खात्यात जमा करावी..’ असा फोन सर्वसामान्यांना येण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात आली आहे.

बीड पोलीस विभागाने जनहितार्थ वरील विषयानुषंगाने जनजागृती करण्यास सुरुवात केली असून, सायबर गुन्हेगारांची आजपर्यंतची पद्धती पाहता सर्वसामान्यांना फोन करून फसवण्यासाठी जाळे फेकण्याची शक्यता वर्तवली आहे. या पत्रक जारी करून त्यामध्ये कशी फसवणूक होऊ शकते आणि त्यावर उपाय योजना करायची, याची माहिती दिली आहे.

स्वत:ला एखाद्या गॅस कंपनीचा अधिकारी सांगून फोन येण्याची शक्यता आहे. बहुतांशवेळा गॅसचे कनेक्शन हे महिलांच्या नावे असल्याने त्यांच्याच फोन क्रमांकावर सायबर भामटे संपर्क करू शकतात. संपर्कातून भामटे, तुमचे गॅस कनेक्शन बंद होणार आहे, पैसे भरण्यासाठी एपीके लिंक पाठवण्यात येऊ शकते, लिंक क्लिक होताच मोबाईल फोन हॅक करून बँक खात्यातून पैसे ट्रान्सफर होण्याची शक्यता आहे.

त्यासाठी अनोळखी एपीके लिंक आेपन करू नका, आेटीपी किंवा पीन क्रमांक देऊ नका, संशयास्पद फोन लगेच बंद करा, फसवणूक झाल्यास त्वरित संपर्क करा, आदी उपाय बीड पोलिसांकडून कळवण्यात आले आहेत. सायबर फसवणूक झाल्यास १९३० या क्रमांकावर तक्रार नोंदवणे, ‘सायबरक्राईम.गव्ह.इन’ या संकेतस्थळावर संपर्क करा किंवा तक्रार नोंदवावी, असेही सांगण्यात आले आहेत.

सायबर गुन्हेगारांची कार्यपद्धती

बीड जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील सायबर विभागाकडून जनजागृतीसाठी गॅस टंचाईच्या परिस्थितीत काही गुन्हेगारांकडून फसवणूक होण्याची शक्यता आहे. त्यांच्या आजपर्यंतच्या कार्यपद्धतीचा इतिहास पाहता अशा परिस्थितीचा लाभ घेण्याची शक्यता असून, नागरिकांनी सतर्क राहून एखाद्या गॅस कंपनीचा अधिकारी बोलतोय, या नावाखाली फोन आला तर सावध राहावे. कुठल्याही लिंकवर क्लिक न करता व्यवहारातही पडू नये. अद्याप असा फोन येऊन फसवणूक झाल्याची कुठली तक्रार आलेली नाही. – जनसंपर्क अधिकारी, बीड जिल्हा पोलीस अधीक्षक.