छत्रपती संभाजीनगर – मॅडम माझे बैल चोरीला गेले आहेत, अशी तक्रार घेऊन आलेल्याचा बनाव पोलिसांनी या प्रकरणात केलेल्या सखोल चौकशीत उघड झाला. अखेर बैलचोरीचा बनावच तक्रारदाराच्या अंगलट आल्याची घटना बीडच्या वडवणी पोलीस ठाण्याअंतर्गत उघडकीस आली. याप्रकरणी गुन्हा दाखल करून बनाव करणाऱ्यास अटक करण्यात आली आहे.

संपत निपटे व त्याचा भाऊ मदन निपटे यांच्या विरोधात वडवणी ठाण्यात पोलीस अंमलदार नितीन काकडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सरकारतर्फे देण्यात आलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, “सर्व परिस्थिती माहिती असतानाही पोलिसांचे कायदेशीर अधिकाराचा गैरवापर करण्यासाठी व पोलिसांना खोटी माहिती देवून त्यांची दिशाभूल करणे” या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक, नवनीत काँवत यांनी बीड जिल्ह्यात पदभार घेतल्यापासून खोट्या तक्रारीचे प्रमाण बहुतांश कमी झालेले आहे. यापूर्वी खोट्या तक्रारी देणाऱ्या तक्रारदारावर जिल्ह्यात गुन्हे झालेले आहेत. परंतु पुन्हा एकदा असा प्रकार वडवणी पोलीस ठाण्यात घडला.

१३ नोव्हेंबर रोजी संपत त्रिंबक निपटे व त्यांचे भाऊ त्रिंबक नीपटे (रा. पिंपरखेड) यांनी वडवणी पोलीस ठाण्यात त्यांचे दीड लाखाची बैल जोडी पंधरा दिवसांपूर्वी चोरी गेल्याची माहिती वडवणी पोलीस ठाण्याच्या सहायक निरीक्षक वर्षा व्हगाडे यांना दिली. इतके दिवस तुम्ही तक्रार देण्यासाठी का आला नाही? तुमच्या बैलजोडी संदर्भात काही आर्थिक व्यवहार आहे का? अशी विचारणा व्हगाडे यांनी वारंवार विचारणा करूनही तक्रारदार आपल्या मतावर ठाम होते. त्यानंतर पोलिसांनी संबंधित बैलजोडी संदर्भात तपासाची चक्रे फिरविली. त्यात बैलजोडी ही श्रीकांत चंद्रकांत मगर (रा. भावठाणा ता. आंबेजोगाई) या शेतकऱ्याकडे असल्याची गोपनीय माहिती मिळाली.

पोलिसांनी त्यास समक्ष पोलीस ठाणे येथे बैल जोडीसह आणले असता त्याने ही जोडी बाबाराव डाके (रा. टकारवाडी, ता. माजलगाव) याचेकडून विकत घेतल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी मध्यरात्री टकारवाडी येथे जावून बाबाराव डाके यांचेकडे चौकशी केली असता, त्याने ही बैल जोडी तक्रारदार संपत निपटे यास पैसे देऊन विकत घेतली, असे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी पुन्हा विश्वासात घेऊन तक्रारदाराची चौकशी केली असता त्यानेच हा बैलचोरीचा खोटा बनाव केल्याचे तपासात निष्पन्न झाले. तर श्रीकांत मगर यास ही बैलजोडी परत केली.