छत्रपती संभाजीनगर – गहिनीनाथ गडावर आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत माजीमंत्री धनंजय मुंडे यांनी हेलिकॉप्टरमधून प्रस्थान करताच त्याच्या दुसऱ्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) राष्ट्रीय पातळीवरील नेते प्रफुल्ल पटेल यांचे धनंजय मुंडे हे लवकरच मंत्रीमंडळात दिसतील असे विधान आले. तर मंत्री पंकजा मुंडे यांच्या स्वागताला आमदार धस यांची हजेरी, या सर्व राजकीय घडामोडींची चर्चा सध्या बीड जिल्ह्यात सुरू आहे. जिल्हा परिषद निवडणुका घोषित होण्यापूर्वी दोन दिवस आधी घडलेल्या या घडामोडीने “राजकीय पर्यावरण” बदलल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
गहिनीनाथ गडावर स्वतंत्र हेलिकॉप्टरने आलेल्या राज्याच्या पर्यावरण आणि पशुसंवर्धनमंत्री पंकजा मुंडे यांच्या स्वागताला चक्क त्यांचे पक्षांतर्गत विरोधक म्हणून चर्चेत आलेले सुरेश धस अवतरले होते. विधानसभेचा निकाल लागल्याक्षणीच सुरेश धस यांनी त्यांच्या विजयोत्सवातच पंकजा मुंडे यांना थेट हल्ला चढवत लक्ष्य केले होते. त्यानंतरही सातत्याने जाहीर टीका करण्याची एकही संधी आमदार धस यांनी सोडली नव्हती. लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांच्या विजयासाठी जिवाचे रान केले पण त्यांनी विधानसभा निवडणुकीत महायुती असतानाही अपक्ष उमेदवार म्हणून लढणारे भीमराव धोंडे यांना अप्रत्यक्ष मदत केल्याचा आरोप धस यांनी केला होता.
मात्र पंकजा मुंडे यांनी आपण पक्षाच्या शीर्षस्थ नेत्यांपुढे गाऱ्हाणे मांडणार असल्याचा इशारा देताच धस यांच्याकडून होणारी टीका थांबली. दोघांमधील दरी मिटवण्यासाठी पक्षाकडून प्रयत्न सुरू झाले. जिल्हा परिषद निवडणुका घोषित होण्यापूर्वीच मंत्री मुंडे व आमदार धस यांच्याकडे पक्षाकडून जबाबदाऱ्यांचे वाटप करण्यात आले. त्यानंतर छत्रपती संभाजीनगरसह अनेक ठिकाणी पक्षाच्या कार्यक्रमात मंत्री पंकजा मुंडे व आमदार सुरेश धस एकत्र येऊन मंचावर दिसले आहेत.
दोन दिवसांपूर्वी गहिनीनाथ गडावर संत वामनभाऊ महाराजांच्या ५० व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी आलेले मुख्यमंत्री व त्यानंतर आलेल्या मंत्री पंकजा मुंडे यांचेही स्वागत आमदार धस यांनी केले. या कार्यक्रमानंतर परळीचे आमदार धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांसमवेत हेलिकॉप्टरमधून उड्डान केले. त्याच्या दुसऱ्याच दिवशी आमदार धनंजय मुंडे यांचा लवकरच मंत्रीमंडळात समावेश होणार असल्याचे विधान खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केले.
धनंजय मुंडे यांना संतोष देशमुख हत्याप्रकरणात लोकभावनेचा विचार करून राजीनामा द्यावा लागला असला तरी अद्यापही त्यांचे या प्रकरणात कुठेही नाव नसल्याचेही विधान खासदार पटेल यांनी केले. संतोष देशमुख हत्या प्रकरण लावून धरण्यात आणि त्यात धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मीक कराड हाच मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप करण्यात आमदार सुरेश धस आघाडीवर होते. त्यातून अखेर धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला होता.
