बीड :  दुष्काळाच्या प्रश्नांवर काढलेल्या मोर्चात शेतकऱ्यांच्या पाणीप्रश्नांऐवजी माझ्या चारित्र्यहननाचा प्रयत्न करणाऱ्या माजी आमदार बाळासाहेब आजबे यांनी आधी स्वतःच्या जिभेला आवर घालावे. माझ्यावर केलेले आरोप सिद्ध करण्याचे धाडस दाखवावे. भाऊसाहेब आजबे यांचे खरेच वारस असाल, तर केवळ आरोप करून पळ काढू नका, पुराव्यांसह आरोप सिद्ध करा. अन्यथा बिनबुडाचे आरोप करणाऱ्यांना कायदेशीर मार्गाने उत्तर दिले जाईल. बाळासाहेब आजबे यांच्याविरोधात अब्रूनुकसानीचा दावा दाखल करण्यात येईल, असा  इशारा महानंद, मुंबईच्या संचालिका प्राजक्ता धस यांनी दिला आहे.

माजी आमदार भीमराव धोंडे आणि माजी आमदार बाळासाहेब आजबे यांनी नुकताच दुष्काळी मोर्चा काढला होता. मात्र, या मोर्चात दुष्काळ, पाणीटंचाई आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवण्याऐवजी वैयक्तिक आरोपांचा आधार घेण्यात आला. ‘मॅडमला आवरा’ असे वक्तव्य करणाऱ्या आजबेंनी आधी स्वतःच्या भाषेला लगाम घालावा. माझे चारित्र्यहनन करण्याचा हा केविलवाणा प्रयत्न असून, आजबेंच्या वक्तव्यांतूनच त्यांच्या वैचारिक पातळीचे दर्शन घडते, असे प्राजक्ता धस म्हणाल्या.

 ‘माझ्या पतीचा नैतिक धाक आहे; मला आवरण्याची गरज नाही!’

पाच वेळा आमदार राहिलेल्या माझ्या पतींचा मला नैतिक धाक आहे. त्यामुळे मला कोणीही आवरण्याची गरज नाही. उलट, तुमची नैतिकता नेमकी काय आहे, याबाबतचे अनेक पुरावे माझ्याकडे उपलब्ध आहेत. योग्य वेळी ते जनतेसमोर आणले जातील, असा इशाराही त्यांनी दिला. बाळासाहेब आजबे वारंवार माझ्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत असून, आता या आरोपांचा अतिरेक झाला आहे. त्यामुळे केवळ राजकीय प्रत्युत्तर न देता कायदेशीर लढा देणार असल्याचे प्राजक्ता धस यांनी स्पष्ट केले.