बीड : पुढील दोन महिन्यात बीड – पुणे रेल्वे गाडी सुरू करण्यासाठी प्रयत्न करू. याबाबतची तयारी पूर्ण झाली असल्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिले. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या. गेल्या वर्षी मराठवाडा मुक्ती दिनी या मार्गाची चाचणी पूर्ण झाली होती. या वर्षी याच दिवशी रेल्वे सुरू केली जाणार आहे. वेगाने विकास करण्याचे दिवंगत अजित पवार यांचे बीडबाबतचे स्वप्न आपण पूर्ण करू, असेही त्या म्हणाल्या.

नियोजन समितीची सभेत २०२६ – २७ वर्षासाठी ६२३ कोटी रूपयांच्या आराखड्यास मंजुरी देण्यात आली. यावेळी पर्यावरण व हवामान बदल आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, खासदार बजरंग सोनवणे, आमदार विक्रम काळे, सतीश चव्हाण, प्रकाश सोळंके, धनंजय मुंडे, संदीप क्षिरसागर आदींची उपस्थिती होती. मागील मराठवाडा मुक्ती दिनी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या हस्ते उद्घाटन झाले होते. बीडहून -अहिल्यानगरपर्यंत रोज एक फेरी होते. मात्र, ही रेल्वे पुण्यापर्यंत जात नाही. हडपसरपर्यंत ही रेल्वे जावी यासाठी प्रयत्न करू, असे सुनेत्रा पवार म्हणाल्या.

जिल्ह्याची बदनामी न करण्याचे आवाहन

बीड जिल्ह्याबाबत बाहेर चुकीची प्रतिमा निर्माण होणार नाही, याची सर्वांनी काळजी घ्यावी. हा जिल्हा कष्टकरी, प्रेमळ आणि धार्मिक परंपरा जपणाऱ्या लोकांचा तसेच महिला नेतृत्व धार्जिण जिल्हा आहे. काही घटनांमुळे संपूर्ण जिल्ह्याची बदनामी होऊ नये, यासाठी लोकप्रतिनिधींनी विशेष जबाबदारीने वागणे आवश्यक आहे. जिल्ह्याचा सर्वांगीण विकास हेच सर्वांचे समान ध्येय असावे. बीडची प्रतिमा जपा, विकासाला गती द्या असा सल्ला मंत्री पंकजा मुंडे यांनी दिला. तो काही आमदारांना होता.

उसतोडणी कामगारांचे प्रश्न बैठकीत चर्चेत

बीड जिल्ह्यातून दरवर्षी मोठ्या प्रमाणात उसतोडणी कामगार राज्यात तसेच परराज्यात ऊस तोडणीसाठी जातात. त्यांच्यासाठी सुरू करण्यात आलेल्या उसतोडणी कामगार महामंडळाच्या कारभारावर धनंजय मुंडे व सुरेश धस यांनी प्रश्न उपस्थित केले. या महामंडळात निधीची तरतूद कमी झाली आहे. त्यामुळे नियोजन समितीतून ही रक्कम द्यावी अशी मागणी आमदार धनंजय मुंडे यांनी या बैठकीत केली.