छत्रपती संभाजीनगर – बीडचे पालकमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक कार्यकर्ते, आमदार धनंजय मुंडे यांचे समर्थक म्हणून ओळख असलेले परळीचे माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख यांच्याविरुद्ध भररस्त्यावर मिरवणुकीमध्ये कोंबडं कापल्याप्रकरणी महाराष्ट्र नरबळी व इतर अघोरी प्रथा, जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये परळी पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, वाल्मीक कराडच्या कृत्यांमुळे धनंजय मुंडे यांना मंत्रीपद गमवावे लागले. आता त्यांची इतर आततायी कार्यकर्तेही डोकेदुखी वाढवत असल्याचे उदाहरण समोर आले आहे. याप्रकरणी स्थानिक सामाजिक कार्यकर्ते बालाजी रानबा ढगे यांनी दीपक देशमुख यांच्याविरुद्ध तक्रार दिली आहे.
परळी ठाण्यात तक्रारीनुसार परळी शहरात सप्तश्रृंगी देवीची स्थापना करण्यात आली आहे. त्यानिमित्त टॉवर ते गणेशपार भागात मिरवणूक काढण्यात आली. टॉवरजवळ दीपक देशमुख यांनी टॉवरजवळ शुक्रवारी दुपारी हळद-कुंकू, नागवेलीची पाने कोंबडं व लिंबू कापले. हा अघोरी आणि अंधश्रद्धा पसरवण्याचा प्रकार असून, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे काम करणारे सुकेशिनी नाईकवाडी, विकास वाघमारे, प्रा. दासू वाघमारे, रानबा गायकवाड आदी कार्यकर्तेही तेव्हा उपस्थित होते, त्यांच्या समोरच हा प्रकार घडला असून, त्यानुसार दीपक देशमुखांविरुद्ध अंधश्रद्धा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करावा, असे तक्रारीत नमूद आहे.
दीपक देशमुख यांनी यापूर्वी विनापरवानगी बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या वैद्यनाथ मंदिराच्या कळसाजवळ चढून तेथील बांधकाम कार्यकर्त्यांना हाताशी पाडले होते. त्याची राज्यभर चर्चा झाली होती. दीपक देशमुख हे धनंजय मुंडे व गोपीनाथ मुंडे यांच्यामध्ये परळीचे नगराध्यक्ष कोणाला करायचे, यातून समोर आलेले नाव होते. मुंडे काका-पुतण्यातील वाद, बंडखोरी सार्वजनिकरीत्या समोर आली ती नगराध्यक्ष पदावरून. धनंजय मुंडे यांनी दीपक देशमुख यांचे तर गोपीनाथ मुंडे यांनी जुगलकिशोर लोहिया यांचे नाव नगराध्यक्षपदासाठी पुढे केले होते.
अखेर धनंजय मुंडे यांनी भाजपतील मातब्बर नेते असलेले काका – गोपीनाथ मुंडे यांच्यावर मात करत दीपक देशमुख यांना नगराध्यक्ष केले. तेव्हा धनंजय मुंडे हे गोपीनाथ मुंडे यांच्या विरोधात पुढे मोठे आव्हान पुढे करतील, असा बांधला गेला, कारण गोपीनाथ मुंडे यांच्याबद्दल परळीच्या ज्या पूर्व भागात टोकाची नाराजी होती, मताधिक्य मिळत नव्हते, त्या पूर्व तथा जुन्या परळीतील तरुणांची फळी बांधणी करण्यासाठी जे काही तरुण कार्यकर्ते धनंजय मुंडे यांनी निवडले होते त्यातील एक नाव दीपक देशमुख होते