बीड : वैद्यकीय पदवी नसताना रुग्णांवर उपचार करणाऱ्या एकास अटक करण्यात आली. ऋषिकेश कानडे असे बनावट डॉक्टरचे नाव आहे. या डॉक्टरावर कारवाईसाठी यंत्रणेला १८ तास तपासणी करावी लागली.
बीड शहरातील राजीव गांधी चौक येथील ‘संजीवनी आयुर्वेदिक हॉस्पिटल’वर अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त माधव निमसे आणि अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक जनाबाई सांगळे आणि आरोग्य विभागातील अधिकारी यांच्या पथकाने संयुक्तपणे छापा टाकला. वैद्यकीय पदवी नसतानाही बनावट प्रमाणपत्राच्या आधारे रुग्णांवर उपचार करत असल्याचे या पथकाला तपासणीअंती आढळून आले.
शिवाजी नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोणतीही अधिकृत वैद्यकीय पदवी नसताना काही व्यक्ती लोकांच्या आरोग्याशी खेळत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक कार्यालयाला प्राप्त झाली होती. गुरुवारी शासकीय पंच, शासकीय वैद्यकीय अधिकारी आणि अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त माधव निमसे यांना पथकासह ‘संजीवनी आयुर्वेदिक हॉस्पिटल’वर अचानक छापा टाकला. हॉस्पिटलमध्ये प्रवेश केल्यानंतर तिथल्या व्यक्तीने आपले नाव डॉ. ऋषिकेश दत्तात्रय कानडे असे सांगितले. या बनवाट डॉक्टरकडे वैद्यकीय परिषदेचे प्रमाणपत्र आणि पदवी मागितली असता ती उपलब्ध नव्हती. भिंतीवर लावलेले प्रमाणपत्र पूर्णपणे बनावट असल्याचे तपासातून स्पष्ट झाले.
या कारवाईदरम्यान पथकाने घटनास्थळावरून ऋषिकेश कानडे याच्याकडून विविध प्रकारच्या औषधींच्या बाटल्या , पांढऱ्या रंगाची पावडर असलेले प्लॅस्टिकचे पुडे आणि वैद्यकीय साहित्य जप्त केले आहे. तसेच घटनास्थळावरून बनावट प्रमाणपत्रही जप्त करण्यात आले. आरोपी ऋषिकेश दत्तात्रय कानडे हा केवळ २९ वर्षाचा आहे.
दुसऱ्याच्या पदवी प्रमाणपत्रामध्ये स्वतःचे नाव
संजीवनी आयुर्वेदिक चिकित्सालय येथील डॉक्टर ऋषिकेश दत्तात्रय कानडे याने डॉक्टर नसताना दुसऱ्याच्या डिग्रीत स्वतःचे नाव तयार करून बोगस प्रमाणपत्र वापरून उपचार करत असल्याची धक्कादायक माहिती कारवाई दरम्यान समोर आली. हा एक प्रकारचा रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू होता. या कारवाईने बीडमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
