बीड – वडवणी शहरातील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात शुक्रवार, दि.२१ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी वाहन पार्किंगच्या किरकोळ कारणावरुन सुरु झालेल्या वादाचे काही वेळातच दोन गटांतील हाणामारी आणि तुफान दगडफेकीत रुपांतर झाले. सुरुवातीला एक गट व नंतर दोन्ही बाजूंनी झालेल्या दगडफेकीमुळे परिसरात मोठी धावपळ उडाली. या घटनेत अनेक जण जखमी झाले असून काही वाहनांचे व दुकानात देखील दगडफेकीत काच व इतर सामानांचे मोठे नुकसान झाल्याची माहिती आहे.
घटनेनंतर वडवणी शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून दंगल नियंत्रण पथकास देखील पाचारण केलेले आहे. सदर घटनेची माहिती मिळतांच वडवणी पोलिसांसह वरिष्ठ पोलीस अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला. दरम्यान, घटनेतील मुख्य सुत्रधार सह दोषींना तात्काळ अटक करावी, अशी मागणी करत संतप्त एका गटाने वडवणी पोलीस ठाण्यासमोर मोठी गर्दी केली.
रात्री उशिरापर्यंत नागरिकांचा ठिय्या सुरु होता.. सुरुवातीला हा वाद किरकोळ स्वरुपाचा होता. मात्र, त्यानंतर शाब्दिक बाचाबाची वाढत गेल्याने परिस्थिती चिघळली. काही वेळाने दोन्ही बाजूंचे समर्थक मोठ्या संख्येने परिसरात जमा झाल्यानंतर परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. काही वेळातच मोठ्या संख्येने जमलेल्या काही युवकांनी आपल्या हातातील दगडे फेकण्यास सुरुवात केली त्यानंतर मोठ्या प्रमाणावर गोंधळ उडाला दोन गटांमध्ये दगडफेक सुरु झाली. दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात दगडफेक झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
