छत्रपती संभाजीनगर – धूळवडीला गावच्या जावयाची गाढवावर (गर्दभ) बसवून वाजत-गाजत मिरवणूक काढण्याची एक अनोखी परंपरा बीडच्या केज तालुक्यातील विडा गावात निजामकाळापासून जपली जाते. यंदा शिवाजी दादाराव गालफडे या जावयाची गर्दभ सवारी काढून ९० वर्षांपासून चालत आलेली ही परंपरा कायम पुढे पुन्हा सुरू ठेवली आहे.
गतवर्षी गावालगतच असलेल्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाचे सावट परिसरावर असल्याने प्रथमच परंपरा खंडित झाली होती. तत्पूर्वी करोना काळात बंधने असल्यामुळे मिरवणूक काढण्यात आली नव्हती. यंदाही ही परंपरा खंडित होते की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. धूळवड दोन दिवसांवर आली तरी जावयाचा शोध लागत नव्हता. अखेर धुळवडीच्या पूर्वसंध्येला दोन जावई निश्चित झाले होते. त्यापैकी शिवाजी गालफडे यांची मंगळवारी सकाळी धुळवडीच्या दिवशी गर्दभ सवारी काढण्यात आली. रंग उधळीत गावातून काढलेल्या या मिरवणुकीनंतर जावईबापूंचा साडी-कपड्यांचा आहेर करून मंदिरात सन्मान करण्यात आला, असे गावचे सरपंच सूरज पतैत यांनी सांगितले.
विडा गावच्या मुलीशी विवाह केलेल्या जावयाची धूळवडीला गाढवावरून मिरवणूक काढून व नंतर सन्मानाने कपडे, सोन्याची अंगठी आहेर आदी करण्याची एक अनोखी परंपरा गावाने जपली आहे. मराठवाड्यात जावई बापूंची गाढवावरून मिरवणूक व नंतर सन्माने आहेर, अशी परंपरा फारसी कुठे आढळत नाही.
काय आहे परंपरा?
निजामकालीन जहागीरदार ठाकूर आनंदराव देशमुख यांनी धूलिवंदनाच्या दिवशी सासुरवाडी असलेल्या विडा येथे आलेले त्यांचे जावई बाळानाथ चिंचोली (जि. लातूर) यांची गंमतीतून गाढवावर बसून सवारी काढली होती. तेव्हापासून धूलिवंदनाच्या दिवशी जावई बापूंची गाढवावरून मिरवणूक काढण्याची परंपरा रूढ झाली. विडा येथील जावई शोध समिती ही जावईबापूला पकडून आणते. धुलिवंदनाच्या दिवशी ग्रामपंचायतीसमोर चपलांचा हार घातलेल्या गाढवावर बसवून वाजत-गाजत मिरवणूक काढली जाते.
होळीच्या पूर्वसंध्येला दोन जावई सापडले, पण दुपारी ते चकवा देऊन गेले. संध्याकाळपर्यंत त्यांचा शोध घेतला गेला. धूळवडीला शिवाजी गालफडे हे जावई सापडले. त्यांनी मिरवणूक काढण्याची परंपरा कायम राखली जाईल, याचा सन्मान राखून प्रतिसाद दिला आहे. – सूरज पतैत, सरपंच, विडा
गावात दीडशेपेक्षा अधिक जावई
गावात सोयरीक झालेले दीडशेहून अधिक जावई आहेत. पैकी ४० जावयांची विडेकरांनी मिरवणूक काढली आहे.
