बीड – केज तालुक्यातील टाकळी येथील विलास घुले हत्या प्रकरणात त्यांच्या कुटुंबीयांनी खासदार बजरंग सोनवणे यांचे पुत्र सौरव यांच्या अटकेच्या मागणीसाठी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. बुधवारी घुले कुटुंबीयांनी सामूहिक आत्महत्येचा इशारा दिल्याने खळबळ उडाली आहे. राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते बीडमध्ये मुक्कामी येत असून, घुले कुटुंबीयाने दिलेल्या इशाऱ्या नंतर तपासाच्या दृष्टीने प्रतिक्रिया पुढे येते, याकडे लक्ष लागले आहे.

काही दिवसांपूर्वी आम्ही वंजारी भटके विमुक्त म्हणून आम्हाला न्याय मिळत नाही, असे पत्र मृत विलास घुले यांचे बंधू रमेश घुले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवले होते. या पत्राची चर्चा देखील झाली होती. या पार्श्वभूमीवर बीड जिल्हा पोलीस प्रशासन कडक कारवाई करेल अशी अपेक्षा घुले कुटुंबीय व्यक्त करत होते. संबंधित पत्राची दखल घेत राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे (सीआयडी) एक पथक केज येथे दाखल झाले होते. या तपासात गुन्हे अन्वेषण विभागाच्या हाती काय माहिती लागली हे समोर आले नाही. मात्र घुले हत्या प्रकरण घडल्यानंतर आणि मुलावर आरोप होत असताना खासदार बजरंग सोनवणे यांनी दोनवेळा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीत भेट घेतली आहे.

दरम्यान एकंदरीत परिस्थिती पाहता गुन्हे अन्वेषण विभागाच्या तपासावरही घुले कुटुंबीय संतुष्ट नसल्याचे निदर्शनास येते. यानंतर आता खासदार पुत्र सौरव सोनवणे याला अटक करण्यात यावी या मागणीसाठी बुधवारपासून घुले कुटुंबीय बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहे. विशेष बाब म्हणजे महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक बीड शहरात दाखल होण्याच्या पूर्वसंध्येला या सर्व घडामोडी घडल्याने पोलीस प्रशासन देखील दक्ष झाले आहे.

आम्ही न्याय मिळावा म्हणून मुंबईत निवेदन देण्यासाठी ६ दिवस थांबलो. मात्र प्रशासनाने दखल घेतली नाही. तुम्ही दुसऱ्या १०० जणांना अटक केली तरी काय उपयोग, तुम्ही मुख्य आरोपीला आणखी आम्हाला मारण्यासाठी बाहेर ठेवलेय का , असा सवाल मृत विलास घुलेच्या आईने माध्यमांशी बोलताना केला . जर आरोपीला अटक झाली नाही, आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही सर्व कुटुंब आत्महत्या करू, असा टोकाचा इशारा देखील त्यांनी दिला. खासदार बजरंग सोनवणे यांचा मुलगा सौरव सोनवणे यांच्यावर घुले कुटुंबाने गंभीर आरोप केले आहेत. मुख्यमंत्र्यांनी एकाला एक न्याय आणि दुसऱ्या एक न्याय अस करू नये, लहान जात असली म्हणून काय झाले, न्याय मिळणार नाही का, असे घुले कुटुंबीयांचे म्हणणे आहे.

जबाबात नाव, मग अटक का नाही

रमेश घुले म्हणाले की, जखमी असताना देखील माझ्या भावाने (मृत विलास घुले) सौरव सोनवणेचे नाव घेतलेले आहे. सौरव यांनीच विलासला मारायला सांगितले होते. त्यावेळी जे साक्षीदार उपस्थित होते त्यांनी देखील आपल्या जबाबात अशीच साक्ष दिलेली आहे. असे असूनही पोलीस सौरव सोनवणेला का अटक करत नाही, आम्ही मेल्यावर प्रशासनाला जाग येणार का, असा संतप्त सवाल रमेश घुले यांनी केला.