छत्रपती संभाजीनगर : सावत्र नात्यातील आई व तरुण मुलाने पाठोपाठ आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. केज तालुक्यातील एका गावातील रहिवासी असलेले मृत हे प्रेमवीर असल्याची चर्चा असून, दोघांचेही मृत्यू अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ग्रामीण रुग्णालयात झालेले आहेत.

युसूफ वडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सोनी जवळा गावचा रहिवासी असलेल्या तरुणाने केज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील केवड गावच्या परिसरात बुधवारी दुपारी विष घेतल्यानंतर त्याला उपचारासाठी अंबाजोगाईतील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रात्रीच्या सुमारास उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूच्या धक्क्याने सावत्र आईनेही गुरुवारी सकाळीच शासकीय रुग्णालयाच्या परिसरातील एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.

केज व युसूफ वडगाव पोलीस ठाण्याच्या पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मृत विवाहितेच्या पतीचे दोन विवाह झाले होते. पहिल्या पत्नीसोबत घटस्फोट झाल्यानंतर त्या पतीने मृत महिलेसोबत दुसरा विवाह केला होता. दरम्यान, मृत महिलेचे पतीच्या पहिल्या पत्नीच्या २१ वर्षीय मुलासोबत सूत जुळले. एके दिवशी मृत महिलेच्या पतीने पत्नी हरवल्याची तक्रार केज पोलीस ठाण्यात नोंदवली.

दरम्यान संबंधित तक्रारदाराचा तरुण मुलगाही पळून गेल्याचे समोर आले. पोलिसांना दोघेही हैद्राबाद येथे असल्याची माहिती मिळाली. मात्र, मागील आठवड्यात संबंधित पतीची हरवलेली पत्नी स्वत:हून पोलीस ठाण्यात हजर झाली. तिने तक्रारदार पतीसोबत राहायचे नसल्याचा जबाब नोंदवला. पोलिसांनी तिच्या पतीला बोलावून जो जबाब दिला त्याची माहिती दिली होती, अशी माहिती केजचे पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.

पळून गेलेल्या सावत्र आई व मुलातील नाते प्रेमसंबंधात असल्याची सर्वत्र चर्चा सुरू झाल्यानंतर बदनामीच्या भीतीने मुलाने बुधवारी विष प्राशन केले. त्याचा रात्री मृत्यू झाला. तर गुरुवारी सकाळी महिलेनेही शासकीय रुग्णालयाच्या परिसरातील एका झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेची माहिती रुग्णालयाकडून अंबाजोगाई पोलीस ठाण्याला देण्यात आल्यानंतर पंचनामा व शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.

पती-पत्नीचा दुसरा विवाह

या घटनेतील मृत महिलेने ज्या व्यक्तीसोबत संसार थाटला होता तो तिचा दुसरा पती. तर या दुसऱ्या पतीचीही मृत महिला दुसरी पत्नी. या पतीच्या पहिल्या पत्नीच्या मुलासोबत मृत महिलेचे सूत जुळले व दोघेही पळून गेल्याने सावत्र आई-मुलाच्या प्रेमसंबंधाची चर्चा केज तालुक्यात मागील काही दिवसांपासून सुरू आहे.