छत्रपती संभाजीनगर : गेल्या वर्षी देशी-विदेशी मद्य आणि बीअर उत्पादन आणि विक्रीतून मिळालेल्या पाच हजार ८०९ कोटी रुपयांच्या उत्पन्नात या वर्षी १ हजार ४० कोटी रुपयांची भर पडली. त्यात १७.८१ टक्क्यांची वाढ झाली. मात्र, विदेशी मद्य उत्पादन आणि विक्रीमध्ये मोठी घसरण दिसून आली. परिणामी विदेशी मद्यामुळे १३२ कोटी ७४ लाख रुपयांचे उत्पन्न घटले.
तर बीअरच्या उत्पन्नात मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत ७०१ कोटी ८६ लाख रुपयांची महसुलामध्ये वाढ झाली. या वर्षी नव्याने आखलेल्या महाराष्ट्रचा विदेशी मद्य उत्पादन धाेरणामुळे उत्पन्नात ४७१ कोटी रुपयांची भर पडली. राज्य उत्पादनशुल्क आकारणीमध्ये या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये अचानक धोरणात्मक बदल करण्यात आले. एका प्रूफ लिटरसाठी महाराष्ट्रातील मूळ रहिवासी व्यक्तीने विदेशी मद्यनिर्मिती केल्यास ४२५ रुपये शुल्क आकारले जाते.
त्याच वेळी विदेशी मद्य करणाऱ्या बहुराष्ट्रीय कंपनीसाठी लावले जाणारे शुल्क ७५० रुपये एवढे आहे. कमी शुल्क लावलेले असतानाही महाराष्ट्रनिर्मित विदेशी या वर्षीचा महसूल २४० कोटी रुपये मिळाला. त्याच वेळी बहुराष्ट्रीय कंपन्यांनी विदेशी मद्य आणि विक्रीमध्ये मोठी घट दिसून आली. गेल्या वर्षीच्या तुलनेत महाराष्ट्राबाहेरील उत्पादकांनी २०२ लिटर मद्य उत्पादन कमी केले. हे प्रमाण २५.४४ टक्क्यांनी घटले. तर, विक्रीमध्येही २४ टक्क्यांची घट दिसून आली. गेल्या वर्षीच्या तुलनेने १९४ लाख लिटर विक्री कमी झाली.
बीअर पिण्याचे प्रमाण वाढले
गेल्या वर्षीच्या तुलनेत बीअरनिर्मितीमध्ये ५७२ लाख ७४ हजार लिटर बीअर उत्पादन अधिक झाले. निर्मितीमधील ही वाढ १३.७२ टक्के असल्याचे दिसून आले. या वर्षी बीअर विक्रीमध्येही मोठी वाढ दिसून आली. ६३१ लाख ९४ हजार लिटर बीअर विक्री झाली. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही वाढ १५ टक्के आहे. यामुळे राज्याच्या महसुलामध्ये ७०१ कोटी रुपयांची वाढ दिसून आली. बीअर विक्रीतून मिळणारे हे उत्पादन २१ टक्क्यांनी वाढले आहे. कर वाढविल्यामुळे उत्पन्नात वाढ झाली असल्याचे सांगण्यात येत आहे.
महसुलाचे ‘उद्दिष्ट’ ८४ टक्क्यांवर
महाराष्ट्राचा अधिवासी असणाऱ्या मद्यनिर्मिती कंपनीस कमी महसूल आकारण्याच्या धाेरणामुळे हवे तेवढे उत्पन्न राज्य सरकारच्या हाती लागले नसल्याची चर्चा मद्यनिर्मिती क्षेत्रात आहे. या वर्षी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सहा बीअर आणि सहा विदेशी आणि चार महाराष्ट्र उत्पादित विदेशी मद्यनिर्मिती करणाऱ्या कंपन्यांकडून ८१७० कोटी रुपये मिळतील असे अपेक्षित होते.
मात्र, महसुलामध्ये अंदाजे १८ टक्क्यांची वाढ होऊन राज्याचे उत्पन्न ६ हजार ८५० कोटींवर थांबले. महाराष्ट्र उत्पादित विदेशी मद्यास लावण्यात आलेल्या शुल्कात मोठा फरक आहे. तरीही ऑक्टोबरपासून १३८ लाख लिटर विदेशी मद्य उत्पादित करून १३३ लाख लिटर विक्री झाल्याने ४७१ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. खरे विदेशी मद्यापेक्षा महाराष्ट्रनिर्मित मद्य ग्राहकास तुलनेने स्वस्त मिळते. त्याचेही परिणाम दिसू लागले आहे. या क्षेत्रात आता अनेक राजकीय नेतेही उतरले आहेत.
प्रूफ लिटर म्हणजे काय ?
एका लिटरमध्ये ४२ टक्के अल्कोहोल असावे, असे ठरविण्यात आले आहे. तेवढे प्रमाण असेल तर किती शुल्क लावायचे याचे सूत्र ठरविण्यात आले आहे. एक लिटर द्रव असले, तरी त्यातील अल्कोहोलचे प्रमाण दर्शविण्यासाठी प्रूफ लिटर हे एकक वापरले जाते.
