औरंगाबाद: राज्यात एमआयएम पक्षाचा प्रवेश झाला होता तेव्हा तो पक्ष मतांमध्ये विभाजन करणारा आणि केसीआर यांचा पक्ष आल्यानंतर तसे कोणीच काही म्हटले नाही. नांदेडपासून त्यांनी पक्ष बांधणीला सुरुवात केली आहे. तेलंगणाला लागून असणाऱ्या काही गावांमध्ये या पक्षाला वाढीला जागा आहे. राज्यातील सीमावर्ती भागाचा विकास झाला नाही, हे तेथील जनतेला माहीत आहे. ते तेलंगणातील विकास पाहताहेत त्यामुळे केसीआर यांना पाठिंबा वाढेल, असेही खासदार इम्तियाज जलील म्हणाले.
२५ व २६ ऑक्टोबर रोजी एमआयएमचे राष्ट्रीय अधिवेशन मुंब्रा येथे होणार आहे. या अधिवेशनाला सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. सध्या एमआयएम या पक्षाला मित्रपक्षाची गरज आहे. ‘ आमच्या बरोबर कोणी येत नाही’, अशी खंत खासदार जलील नेहमी व्यक्त करू लागले आहेत. अशा काळात तेलंगणातील युतीमध्ये असणारा भारत राष्ट्र समिती हा पक्ष राज्यात प्रवेश करू इच्छित आहे. त्याचे ‘एमआयएम’कडून स्वागत करण्यात येत आहे. के.सी. राव यांनी नांदेड जिल्ह्यातील दलित आणि मुस्लीम वस्त्यांमध्ये खास बैठकाही घेतल्या. तेलंगणामध्ये जाण्यास इच्छुक असणाऱ्या काही गावांमध्ये ‘बीएचआर’चा विस्तार होऊ शकतो, असे सांगण्यात येत आहे. राज्यातील शेती प्रश्नांना हात घालून पक्ष विस्ताराची पावले ठरविण्यात आली आहेत. नुकतेच केसीआर यांनीही असदोद्दीन ओवेसी यांचे कौतुक केले होते. देशभरातील मुस्लीम समाजाचे नेतृत्व करण्यासाठी तेलंगणातील एक व्यक्ती निघाला आहे, त्याचे कौतुक व्हायला हवे, असे ते म्हणाले होते. या पार्श्वभूमीवर भारत राष्ट्र समितीचेही एमआयएमकडून स्वागत होत आहे. पण हा पक्ष मतांमध्ये विभाजन करणारा नाही का, असा प्रचार का होत नाही, असेही जलील यांनी म्हटले आहे.