छत्रपती संभाजीनगर : भोकरदनजवळील पाणीपुरवठा करणाऱ्या धरणात केवळ पाच टक्के पाणी साठा आहे. याच महिन्यात भोकरदन शहरात टँकरने पाणी द्यावे लागेल, असे चित्र असल्याने आरक्षित पाणीसाठा राखून ठेवण्याबाबत जागृती व्हावी आणि पाणी चोरी होऊ नये म्हणून धरण परिसरात पोलीस आणि जलसंपदा विभागाने गस्त सुरू केली असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खामगळ यांनी सांगितले. जालना जिल्ह्यात भोकरदन आणि घनसावंगी या दोन तालुक्यात पिण्याच्या पाण्यासाठी प्रशासनाला कसरत करावी लागणार आहे. केवळ गस्त घालून चालणार नाही तर पाणी राखून ठेवण्यासाठी बाष्पीभवन रोखण्याची मागणीही जोर धरू लागली आहे.
एलनिनोमुळे येत्या काळात सरासरी तापमानात चार अंशांपर्यंत वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. सध्याच्या धरणातील पाण्याचा साठा लक्षात घेता त्याचे बाष्पीभवन कमीत कमी व्हावे यासाठी पाण्यावर अस्तरीकरणाची प्रक्रिया हाती घ्यावी. काही जिल्ह्यात याचे प्रायोगिक प्रकल्प हाती घ्यावेत, अशी मागणी आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे एका पत्रान्वये केली आहे. जालना आणि धाराशिव या दोन जिल्ह्यातील घटनांमुळे पाणीटंचाईची भीषणता अधिक असेल असे दिसून येत आहे.
भोकरदन नगरपंचायतीला जुई प्रकल्पातून पाणी पुरवठा होतो. या धरणातून पाच टक्के पाणी पुरवठा होतो. भोकरदनचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र देशमुख म्हणाले, ‘भोकरदन शहर हे ४० हजार लोकसंख्येचे शहर आहे. पुढील १५ दिवस पुरेल एवढेच पाणी शिल्लक आहे. पूर्वी धामणा प्रकल्पातून टँकरसाठी पाणी घेतले होते. आता या प्रकल्पात पाणी शिल्लक नाही.’ ही स्थिती बहुतांशी मराठवाड्यात गावोगावी तयार होत आहे. परिणामी पोलिसांची गस्त घालण्याबरोबरच बाष्पीभवन रोखण्याच्या उपाययोजना करा, अशी मागणी केली जात आहे.
निवडक जलाशयांवर बाष्पीभवन कमी करण्याचे प्रयोग करावेत
बाष्पीभवन कमी करण्यासाठी जलाशयावर रसायने टाकून वाफ कमी होईल, असे प्रयत्न करण्याची गरज आहे. तसे तंत्रज्ञान उपलब्ध आहे. तसे प्रयोग करावेत अशी मागणी महसूल मंत्र्यांकडे केली आहे, असे आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. या तंत्रज्ञानाची परिणामकारकता, तापमान, वाऱ्याचा वेग, आर्द्रता, जलाशयाचे क्षेत्रफळ, पाण्याची गुणवत्ता आणि स्थानिक हवामान या सगळ्याचा अभ्यास करून बाष्पीभवन कमी झाल्यास दुष्काळात काही अधिक दिवस पाणी राखून ठेवता येईल, अशी भूमिका त्यांनी विषद केली.
