छत्रपती संभाजीनगर : लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील तुपडी येथील २६ वर्षीय विवाहितेचा भोपाळ येथे संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कल्पना सतीश कसबे असे मृत महिलेचे नाव असून, सासरच्या मंडळींनी छळ करून गळा आवळून खून केल्याचा गंभीर आरोप नातेवाईकांनी केला आहे.

तुपडी येथील कल्पना हिचा विवाह चाकूर तालुक्यातील महाळगरा येथील सतीश कसबे याच्याशी झाला होता. सतीश कसबे हा सध्या भोपाळ येथे नोकरीसाठी वास्तव्यास आहे. विवाहानंतर काही काळ सर्व काही सुरळीत असले तरी, मागील काही दिवसांपासून पती, सासू आणि सासरे यांनी कल्पनावर मानसिक तसेच शारीरिक छळ केल्याचा आरोप तिच्या माहेरच्या नातेवाईकांनी केला आहे.

तीन दिवसापूर्वी मृत्यू

तीन दिवसांपूर्वी भोपाळ येथे कल्पनाचा मृत्यू झाला. मात्र हा मृत्यू नैसर्गिक नसून गळा आवळून खून केल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. घटनेची माहिती उशिरा देण्यात आल्याचाही आरोप करण्यात येत आहे.

भोपाळहून कल्पनाचा मृतदेह लातूर जिल्ह्यात आणण्यात आला असून, चाकूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या नळेगाव आउट पोस्ट येथे नातेवाईक मोठ्या संख्येने जमा झाले आहेत. मृतदेहाची अवस्था अत्यंत खराब असून अंगावर मारहाणीच्या खुणा दिसत असल्याचा दावा नातेवाईकांनी केला आहे.

जोपर्यंत आरोपी पती आणि सासरच्यांवर कठोर कारवाई होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी आक्रमक भूमिका नातेवाईकांनी घेतली आहे. तसेच पोलिसांकडून योग्य ती कारवाई होत नसल्याचा आरोप करत संताप व्यक्त केला आहे. या दुर्दैवी घटनेनंतर कल्पना हिच्यामागे दहा वर्षांचा मुलगा आणि सात वर्षांची मुलगी असा परिवार आहे. आईच्या मृत्यूमुळे या दोन लहान मुलांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

गुन्हा नोंदविण्यावरुन टाळाटाळ

गुन्हा नोंदवण्यावरून पोलिसांत टोलवाटोलवी सुरू असल्याचे चित्र समोर आले आहे. चाकूर पोलिसांकडून मृत महिलेचे माहेर निलंगा तालुक्यात असल्याने तक्रार निलंगा पोलीस ठाण्यात द्यावी असे सांगितले जात आहे. तर निलंगा पोलिसांनी हे प्रकरण चाकूर पोलिसांकडे पाठविल्याचे समजते. यामुळे नातेवाईकांमध्ये संभ्रम आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

घटना भोपाळमध्ये घडली असताना तक्रार तेथेच का दाखल करण्यात आली नाही, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. या सर्व प्रशासकीय टोलवाटोलवीत मृतदेह दीर्घकाळ ताब्यात न घेतल्याने त्याची विटंबना होत असल्याची भावना नातेवाईकांनी व्यक्त केली आहे. या घटनेमुळे नळेगाव आऊट पोस्ट परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. अद्याप तोडगा निघाला नाही.