औरंगाबाद : औरंगाबाद शहराभोवती असणाऱ्या प्रमुख तीन रस्त्यांसाठी तीन हजार १०५ कोटी रुपयांची तरतूद करून औरंगाबाद-पैठण या राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणाचे भूमिपूजन केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते २४ एप्रिल रोजी सकाळी होणार आहे. शेंद्रा ते वाळूजदरम्यान एकच मोठा उड्डाणपूल तसेच छोटी मेट्रो सुरू करण्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला जात असून तोही मंजूर होईल, असा दावा केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी बुधवारी पत्रकार बैठकीत केला.

सोलापूर- धुळे रस्त्याचे लोकार्पण याच कार्यक्रमात होणार आहे. नव्या रस्त्यांमुळे व सुविधांमुळे वाहतूक कोंडी दूर होण्यास मदत होईल व प्रवासही सुरक्षित होईल, असे सांगत डॉ. कराड यांनी कोणकोणत्या रस्त्यांची कामे हाती घेतली जाणार आहेत, याची माहिती दिली. ते म्हणाले,की औरंगाबाद ते करोडी या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५२ चे चौपदरीकरण होणार आहे. हा रस्ता ३० किलोमीटरचा असून त्यावर १६७५ कोटी रुपये खर्च होणार आहेत. करोडी ते तेलवाडी या ५५ किलोमीटरच्या रस्त्यासाठी १३८६.७७ कोटी, तर नगरनाका ते केंद्रीय स्कूल या शहरातील १४.४० किलोमीटरच्या रस्त्यासाठी ४३.२० कोटी रुपये खर्च होतील, असे सांगण्यात आले.

 औरंगाबाद-पैठण राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण केले जाणार असून त्यासाठी १६७० कोटी रुपये लागतील. त्याचबरोबर सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत ग्रामीण महामार्गाचे लोकार्पण व भूमिपूजन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे. शिऊरयेवला डांबरीकरण व दुपदरीकरणास १८१ कोटी रुपये खर्च येणार असून हा रस्ता २९ किलोमीटरचा आहे. या रस्त्याचे लोकार्पण होणार असून राष्ट्रीय महामार्ग क्र. ७५२ वरील दौलताबाद टी पॉइंट ते माळीवाडा आणि देवगावरंगारी ते शिऊर या रस्त्याचे डांबरीकरण व दुपदरीकरणाचे भूमिपूजन होणार आहे. कसाबखेडा ते देवगावरंगारी, चिखली, दाभाडी, तळेगाव या रस्त्याचे काँक्रिटीकरण व दुपदरीकरण करण्याच्या कामाचे भूमिपूजनही होणार आहे.

औरंगाबाद शहरातील छावणी परिसरात मिलिंद महाविद्यालयाची उभारणी करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्या बंगल्यात वास्तव्यास होते, तेथे स्मारक उभे करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे डॉ. कराड यांनी सांगितले. छावणी परिसर हा केंद्र सरकारच्या अखत्यारित असल्याने या भागातील पाहणी करण्यासाठी ते आज आवर्जून गेले होते. या वेळी त्यांच्यासमवेत राजू शिंदे, संजय केणेकर, बसवराज मंगरुळे, आमदार अतुल सावे यांची उपस्थिती होती.