छत्रपती संभाजीनगर : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये परंड्याचे आमदार तानाजी सावंत यांचा पुतण्या धनंजय यांनी त्यांच्या विरोधात बंड पुकारल्याचे चित्र उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी आढळून आले. दुसरीकडे उमेदवारीच्या गर्दीत नेत्यांनी त्यांच्या जवळच्या नातेवाईकांचे अर्ज आवर्जून दाखल केले.

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात मोठी गर्दी होती. चारचाकी गाड्यांची मोठीच मोठी रांग सर्वत्र दिसून येत होती. छत्रपती संभाजीनगरमध्ये युतीची घोषणा झाली असली तरी शिवसेना आणि भाजपच्या सदस्यांनी मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे उमेदवारी अर्ज काढून घेण्याच्या दिवशीपर्यंत युती आणि आघाडीचे चित्र नक्की काय होणार, याची नेत्यांना चिंता लागली आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे ग्रामीणचे जिल्हा प्रमुख राजेंद्र राठोड शिंदे सेनेत गेले. त्यांची मुलगी सोयगावमधून धनुष्यबाणाच्या चिन्हावर निवडणूक लढवणार आहे. दरम्यान, जिल्ह्यात ठाकरे गटाकडून ३६ गटांत आणि ७५ गणांमध्ये उमेदवार उभे करण्यात आल्याचे सांगण्यात आले. आघाडीमध्ये काँग्रेस व वंचितनेही उमेदवारी अर्ज दाखल केले. भाजपनेही उमेदवारी अर्ज दाखल करताना नेत्यांच्या जवळच्या नातेवाईकांनी निवडणुकीत उतरू नये, असे आदेश दिल्याने धाराशिवमधून आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असला तरी त्या तो अर्ज मागे घेतील, असे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, नेत्यांनी त्यांच्या नातेवाईकांना जिल्हा परिषदेच्या गटात निवडणुकीत उतरवले आहे. आमदार अब्दुल सत्तार यांचे एक चिरंजीव समीर हे सिल्लोडचे नगराध्यक्ष आहेत. तर जिल्हा परिषदेच्या अंभई गटातून त्यांचे दुसरे चिरंजीव अब्दुल आमेर हे निवडणुकीत उतरले आहेत. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचे चिरंजीव सुरज यांनी शिरूर ताजबंद पंचायत समिती गणातून उमदेवारी अर्ज दाखल केला आहे.

नेत्यांनी त्यांच्या घरातील मंडळींना आवर्जून रिंगणात उतवले आहे. दरम्यान, परंडा व भूम विधानसभा मतदारसंघात माजी मंत्री आमदार तानाजी सावंत यांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. भूम आणि परंडा तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती, असे दोन्हीकडे धनंजय सावंत यांनी स्वतंत्र उमेदवार दिले आहेत. आमदार तानाजी सावंत यांना घरातूनच कडवा विरोध सहन करावा लागेल, अशी चर्चा आता सुरू झाली आहे. उमेदवारांची एकूण संख्या वाढल्यामुळे रात्री उशिरापर्यंत त्याचा ताळमेळ साधण्याचे काम सुरू होते.