छत्रपती संभाजीनगर : कोअर कमेटीतील सदस्यांनी महापौर पदासाठी कोण उमेदवार योग्य ठरतील, याची यादी पाठवली तर त्यावर निर्णय घेतले जातील. अद्याप नावे आले नाहीत, त्यामुळे गट नेता किंवा महापौर पदी इच्छुकांमधील कोण हे ठरले नसल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले. कोअर कमेटी सदस्यांनी आपल्याला सोयीचा व्यक्ती कोण, हे ठरवलेले नाही. मंगळवारी उशिरा भाजपची स्वतंत्र बैठक होणार होती.

जिल्हा परिषद निवडणुकांचा आढावा घेण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे छत्रपती संभाजीनगरमध्ये आले होते. अजित पवार यांच्या निधनानंतर जाहीर सभा घेण्याऐवजी स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांशी चर्चा करून प्रचाराची दिशा ठरविली जात आहे. मराठवाड्यातील पाच जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा आढावा रवींद्र चव्हाण यांनी घेतला. मात्र, छत्रपती संभाजीनगर महापालिकेविषयी फारसे बोलणे झाले नाही. मात्र, कोअर कमेटीच्या सदस्यांनी बहुमत मिळविणाऱ्या महापालिकेचा कारभार कसा असावा, हे लक्षात घेऊन उमेदवाराचे नाव काढावे आणि प्रदेशस्तरावर पाठवावेत, असे निर्देश प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिले असल्याचे सांगण्यात येते. मंत्री अतुल सावे, खासदार डॉ. भागवत कराड, आमदार संजय केनेकर, जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांच्यासह कोअर कमेटी सदस्यांनी नावे कळविल्यास त्यावर निर्णय होऊ शकतो, असे सांगितले आहे. महापौर पदासाठी इच्छुक असणारे समीर राजूरकर, विजय औताडे, शिवाजी दांडगे, राजगौरव वानखेडे, माधुरी आदवंत यांच्यासह नगरसेवक मंगळवारी भाजपच्या विभागीय कार्यालयात होते.

महापालिकेचा पारदर्शी कारभार हा महापौर निवडीमागचा निकष मानून उमेदवार निवडावा, अशी मागणी केली जात आहे. खुल्या गटात निवडून आलो असल्याचा दावा करत अनिल मकरिये हेही स्पर्धेत असल्याचे सांगण्यात येते. अद्याप जिल्हा पातळीवरच नावे न ठरल्यामुळे भाजपमध्ये महापौर निवड जैसे थे याच स्तरावर आहे. प्रत्येक नेता आपल्या जवळच्या व्यक्तीला पद देण्यासाठी रस्सीखेच करत असल्याचे चित्र आहे.