देशात व राज्यात सत्तास्थानी असणारे भाजप सरकार अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी कटिबद्ध असून विविध कल्याणकारी योजना राबवत असल्याचा विश्वास भाजपा अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष जमाल सिद्दीकी यांनी व्यक्त केला.
भाजप महानगर शाखेतर्फे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शहर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे, डॉ. मिना परताणी आदींची उपस्थिती होती. सिद्दीकी म्हणाले की, केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार विविध कल्याणकारी उपक्रम राबवत आहे. दोन्ही सरकार मुस्लिम समाजाच्या विकासासाठी अनेक योजना राबवत असल्याने समाजाला मोठा उपयोग होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. केंद्रीय मंत्री नजमा हेप्पतुल्ला यांनीही मुस्लिम समाजातील पिचलेल्या बांधवांसाठी अनेक योजनांची पर्वणी आणली. ‘नई रोशनी’ योजनेद्वारे बचतगटातील महिलांच्या सक्षमीकरणाची दारे खुली केली. त्यांनी उत्पादित केलेल्या मालास बाजारपेठ उपलब्ध केली जाते. या शिवाय गरिबांसाठी कमवा व शिका ही क्रांतिकारी योजनाही अमलात आणली आहे. या सर्व कल्याणकारी योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी जनजागृती केली जाणार आहे. प्रगती तुमची खुशी आमची हे ब्रीदवाक्य घेऊन प्रत्येक छोटय़ा-मोठय़ा व्यवसायासाठी प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजना सुरू करण्यात आली आहे. याद्वारे शिशू, किशोर व तरुणांसाठी कर्ज व्यवस्था आहे. शिशू कर्जासाठी ५० हजारांपर्यंत, किशोरांसाठी ५० ते ५ लाख, तर तरुणांच्या कर्जासाठी ५ ते १० लाखांपर्यंत व्यवस्था आहे. कुठलेही तारण न ठेवता अत्यंत कमी व्याजदरात हे कर्ज बँकांच्या सर्व शाखांतून मिळणार आहे. या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सिद्दीकी यांनी केले. डॉ. अनिल कांबळे, मोहन कुलकर्णी, संजय शेळके, मधुकर गव्हाणे, राजेश देशपांडे, विजय गायकवाड, अब्दुल वारी आदींची उपस्थिती होती.