सरकार पाणीविरोधी – फडणवीस ; औरंगाबाद येथे भाजपच्या वतीने जलआक्रोश मोर्चा

आठ दिवसाला पाणी देणारे हे सरकार असल्याची टीका केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केली.

औरंगाबाद शहरातील पाणीसमस्यावर लक्ष वेधण्यासाठी भाजपच्या वतीने काढण्यात आलेल्या मोर्चाचे नेतृत्व विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केले. मोर्चामध्ये रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्यासह मोठय़ा संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते.

औरंगाबाद:  महाविकास आघाडी सरकार हे  पाणी विरोधी सरकार आहे. त्यांनी मराठवाडा वॉटर ग्रीड गुंडाळली, कोकणातून मराठवाडय़ाला पाणी देणाऱ्या योजनेचा शासन निर्णय रद्द केला. औरंगाबादसारख्या शहरला पाणी देता आलेले नाही, त्यामुळे हे सरकार पाणी विरोधी सरकार असल्याचा आरोप विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. औरंगाबाद येथे जलआक्रोश मोर्चाचे नेतृत्व त्यांनी केले. या वेळी बोलताना त्यांनी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर आरोप केले. केवळ मुंबई व उपनगरीय भागा पलीकडे त्यांना महाराष्ट्र माहीत नसल्याचेही ते म्हणाले.

औरंगाबाद शहराला दर आठ दिवसाला अवेळी व अपुरा पाणीपुरवठा होत असल्याच्या निषेधार्थ सोमवारी भाजपच्या वतीने पैठण गेट येथून भाजपने मोर्चाचे  आयोजन केले होते.

औरंगाबादमधील हा मोर्चा ही सत्ता परिवर्तनाची नाही तर व्यवस्था परिवर्तनाची लढाई असल्याचे सांगत औरंगाबाद महापालिका ही भ्रष्टाचाराचे कुरण असल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली. पाणी योजनेची निविदा मंजूर करताना वाटा घेतल्याशिवाय पुढे काही झाले नाही, केवळ पाणीच नाही  तर पूर्वी मुख्यमंत्री असताना मंजूर केलेल्या रस्त्याच्या निविदा काढतानाही टक्केवारीवरून निविदा काढल्या नव्हत्या, याची आठवण करुन देत फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारकडून मराठवाडय़ावरही अन्याय केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. वैधानिक विकास मंडळाचे कवचकुंडले काढून घेत या संस्थेचा सरकारने मुडदा पाडला असे म्हणत फडणवीस यांनी सरकारवर टीका केली. औरंगाबाद शहराला पाणी मिळत नाही तोपर्यंत सत्ताधारी मंडळींना झोपू देणार नाही, असेही फडणवीस म्हणाले.

आठ दिवसाला पाणी देणारे हे सरकार असल्याची टीका केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केली. दोन मंत्री जेलमधून आणि मुख्यमंत्री घरातून कारभार पाहत असल्याचीही टीका त्यांनी केली.

औरंगाबाद शहरासाठी मंजूर योजनेच्या कामाला गती नसल्याचे डॉ. कराड यांनी या वेळी सांगितले. मोर्चामध्ये उंटावर झूल टाकून हंडे लटकविण्यात आले होते. तर हंडे घेऊन मोर्चामध्ये सहभागी झालेल्या महिलांची संख्याही लक्षणीय होती.

मराठीतील सर्व औरंगाबाद ( Aurangabad ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bjp jal akrosh morcha lead by devendra fadnavis in aurangabad zws

Next Story
‘तुम्ही माझ्या सभेचे पोस्टर्स फाडू शकता, पण…’ देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी