लातूरमध्ये शून्यातून भाजप सत्तेत!

काँग्रेसचा आणखी एक गड कोसळला

भोपळाही फोडता न आलेल्या भाजपने बहुमत मिळवीत काँग्रेस आणि देशमुखांच्या गडाला धक्का दिला.

काँग्रेसचा आणखी एक गड कोसळला; पालकमंत्री संभाजी निलंगेकर यांची यशाची परंपरा कायम

लातूर या एकेकाळच्या बालेकिल्ल्यात लोकसभा निवडणुकीपासून सुरू झालेली काँग्रेसच्या पराभवाची मालिका महानगरपालिका निवडणुकीतही कायम राहिली आणि पराभवाचे वर्तृळ पूर्ण झाले. गेल्या भोपळाही फोडता न आलेल्या भाजपने बहुमत मिळवीत काँग्रेस आणि देशमुखांच्या गडाला धक्का दिला.

लोकसभा, जिल्हा परिषद, नगरपालिका या निवडणुकांमध्ये पराभव स्वीकारावा लागलेल्या काँग्रेसला लातूरचा गड कायम राखता आलेला नाही. लागोपाठच्या पराभवांमुळे विलासराव देशमुख यांचे राजकीय वारसदार आणि आमदार अमित देशमुख यांच्या राजकीय भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गेल्या महानगरपालिका निवडणुकीत  भाजपाचा एकही नगरसेवक निवडून आला नव्हता तरीही पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी ‘हिरो टू झिरो’ होण्याचा संकल्प केला व त्यादृष्टीने पालिका निवडणूक प्रचाराची यंत्रणा राबवली. राष्ट्रवादी काँग्रेस, काँगेस, शिवसेना या पक्षांतील असंतुष्टांना भाजपात प्रवेश देत क्षमतेनुसार त्यांना निवडणुकीत उतरवले. भाजपमधील सर्व गटतट एकत्र करत सर्वानाच निवडणुकीत आपल्याला यश मिळवायचे आहे ही जिद्द निर्माण केली. केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, राष्ट्रीय प्रवक्ते शहानवाज हुसेन यांच्या सभांनी शहर दणाणून सोडले.

प्रत्येक प्रभागात स्वत सभा घेतल्या व भाजपा सत्तेत येईल असे वातावरण निर्माण केले. काँग्रेसने आपल्या हाती सत्ता असूनही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, कचरा, रस्ते या मुद्दय़ावर काहीच केले नाही. आम्ही सत्तेत आल्यानंतर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा मिटवू, लातूरहून अजमेरसाठी रेल्वे सुरू करू, लातूरचे बसस्थानक गुजरातच्या बसस्थानकाच्या दर्जाप्रमाणे होईल, ज्या योजना नागपूर महानगरपालिकेत राबवल्या जात आहेत त्या लातूरमध्ये राबवू असे सांगत विकासाची नवी स्वप्ने दाखवली. केंद्र व राज्यात भाजप सत्तेत असल्यामुळे महानगरपालिकेत भाजपचीच सत्ता आली तर शहर विकासाला गती मिळेल हे लोकांना पटवून दिले. दलित, मुस्लिम व सर्व जातीधर्माची मते मिळवत भाजपाने स्वबळावर सत्ता मिळवली.

नगरपरिषद व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत फटका बसल्यानंतर काँग्रेस सावध झाली होती. आमदार अमित देशमुख यांनी निवडणूक प्रचाराच्या पहिल्या दिवसापासून लातुरात मुक्काम ठोकला. उमेदवार निवडीच्या बाबतीत काँग्रेस सरस राहिली. मोठय़ा प्रचारसभांऐवजी प्रभागातील सभा घेण्यावर काँग्रेसने भर दिला. अमित देशमुख यांना काका दिलीप देशमुख, सिनेअभिनेते बंधू रितेश देशमुख व बंधू धीरज देशमुख यांनी प्रचारात साथ दिली. राज्यातील डझनभर आमदार व माजी मंत्र्यांना प्रचारासाठी आणले. केंद्र व राज्य सरकार हे थापाडे आहे व काँग्रेसच लातूरच्या विकासात आपल्याला साथ देईल, असे सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र मतदारांना तो फारसा पटला नाही त्यामुळे मागील निवडणुकीत ४९ जागा मिळवणाऱ्या काँग्रेसला ३३ जागांवरच समाधान मानावे लागले. १३ जागा असलेल्या राष्ट्रवादीला केवळ एक जागा मिळवता आली. सहा जागा असलेल्या शिवसेनेला खातेही उघडता आले नाही तर भाजपासोबत युती केलेल्या आठवले गटाच्या रिपाइंला पूर्वी २ जागा होत्या मात्र आता एकही जागा मिळाली नाही. भाजपाने काँग्रेसकडील परंपरागत गड हिसकावून घेतल्यामुळे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांची जिल्हय़ाच्या नेतृत्वावर पकड निर्माण झाली आहे व मराठवाडय़ातील मातब्बर मंत्री म्हणून त्यांची गणना झाली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Bjp latur election results 2017 sambhaji nilangekar congress party

ताज्या बातम्या