नांदेड : संसद अधिवेशन काळातील सुट्यांदरम्यान आपल्या कर्मभूमीमध्ये दाखल होण्याचा परिपाठ मोडत खा. अशोक चव्हाण यांनी शनिवार, रविवारी राजधानी दिल्लीमध्येच मुक्काम केला. या वास्तव्यात ते शनिवारी पुस्तकांच्या सहवासात रमल्याचे बघायला मिळाले. त्यांच्या फेसबुक पोस्टवर अनुकूल व प्रतिकूल प्रतिक्रिया दिसून आल्या.

मागील पाच दिवस दिल्लीमध्ये असलेल्या चव्हाण यांनी अधिवेशनादरम्यान रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन मराठवाड्यातील रेल्वेविषयक मागण्या त्यांच्यासमोर पुन्हा मांडल्या. दुसरे खासदार डाॅ. अजित गोपछडे हेही मंत्री – राज्यमंत्र्यांच्या भेटीवरच दिसले.

जिल्हा बँक निवडणुकीमध्ये खा. चव्हाण यांनी भाजपाशी संबंधित १४ जणांना निवडून आणले; पण निकालानंतर त्यांची नवनिर्वाचित बँक संचालकांची प्रत्यक्ष भेट झालेली नाही. या पार्श्वभूमीवर चव्हाण शनिवार – रविवारी नांदेडला येतील, असे सांगितले जात होते; पण त्यांनी नांदेडला येणे टाळले. काही जाणत्यांना त्यामागच्या कारणांचा अंदाजही आला; पण त्यावर कोणीही चर्चा किंवा भाष्य केले नाही.

खा.चव्हाण शनिवारी दिल्लीमध्येच होते. सुटीच्या दिवसांतील काही वेळ त्यांनी ग्रंथांच्या सहवासात घालविला. राजधानीत एका नामांकित पुस्तकांच्या दुकानात जाऊन चव्हाण यांनी इंग्रजीत नव्याने आलेली काही पुस्तके चाळली. या दुकानात त्यांनी आपल्या संग्रहासाठी काही पुस्तकांची खरेदी केली.

नंतर त्यांनी ‘शनिवार – पुस्तकांसोबत’ या मथळ्याखाली एक फेसबुक पोस्ट जारी केली. वाचन हा माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. वेळ मिळेल तेव्हा, पुस्तकाच्या दुकानात जाऊन नवीन पुस्तके पाहणे, खरेदी करणे आणि वाचन करणे मला आवडते, असे त्यांनी त्यात म्हटले आहे.

ही पोस्ट वाचून अनेकांनी त्यांना चांगला प्रतिसाद दिला तर ब-याच जणांनी टीकात्मक सूरही आळवला. एकाने त्यांना शंकरराव चव्हाणांचे चरित्र पुन्हा वाचण्याचा, दुस-याने स्वातंत्र्याचा इतिहास वाचण्याचा तर आणखी एकाने वाचलेल्या पुस्तकांची यादी पाठविण्याचा सल्ला दिला. काहींनी तर पातळी सोडून हिणकस मतप्रदर्शन केले.