औरंगाबाद : भोंगे प्रकरणानंतर तसेच दौलताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीसमोर नतमस्तक होण्याच्या एमआयएम नेत्याच्या कृतीनंतर ध्रुवीकरणाचे केंद्रिबदू ठरू लागणाऱ्या औरंगाबाद येथे भाजपची राज्यस्तरीय कार्यकारिणीची बैठक जून महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवडय़ात होणार आहे. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पूर्वी ही बैठक २७ आणि २८ मे रोजी ठरविण्यात आली होती. मात्र, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचीही या बैठकीत विशेष आमंत्रित म्हणून उपस्थिती आवश्यक असल्याने ही बैठक आता जूनमध्ये होणार आहे.

प्रदेशाध्यक्षपदी रावसाहेब दानवे असताना जालना येथे भाजपची राज्यस्तरीय बैठक घेण्यात आली होती. मात्र, औरंगाबाद येथे अशी बैठक अलीकडच्या काळात झालेली नव्हती. २००५-२००६ मध्ये राज्यस्तरीय कार्यकारिणीची बैठक आणि लालकृष्ण अडवाणी यांची सभा यापूर्वी झाली होती. मात्र, त्यानंतर राज्यस्तरीय पक्षाची बैठक झाली नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना ही बैठक होत असून या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना आमंत्रित करण्यात आले आहे. त्यामुळे शहा यांची औरंगाबाद येथे सभा होण्याची शक्यता आहे.

 २३ मे रोजी औरंगाबाद शहरातील पाणीप्रश्नी देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मोर्चा काढण्यात येणार असून जेवढे दिवस पाणी, तेवढेच  दिवस पाणीपट्टी आकारा, अशी मागणी या मोर्चातून केली जाणार आहे. गेले काही दिवस संघटनात्मक पातळीवर सुरू असणाऱ्या छोटय़ा-छोटय़ा कार्यक्रमांऐवजी आता भाजपाकडून औरंगाबाद येथे मोठे कार्यक्रम हाती घेतले जात आहेत.

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp meeting in aurangabad in june in presence of amit shah zws
First published on: 17-05-2022 at 03:00 IST