विधानपरिषदेवर संधी नाकारल्याच्या निषेधार्थ आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. हे तिघे औरंगाबादमधील रेल्वे स्टेशन रोडवरील भाजपा कार्यालयासमोर पक्षाविरोधात घोषणाबाजी करत होते.

वरिष्ठ नेत्यांविरोधातही घोषणाबाजी

या प्रकरणी वेदांतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पंकजा मुंडे यांच्या समर्थनार्थ घोषणा सचिन प्रल्हाद डोईफोडे (वय ३२, रा. एन-१, सिडको), योगेश प्रल्हाद खाडे (वय २६, रा. एन – २) व सुनील अशोकराव चव्हाण (वय २५, रा. जयभवानीनगर) या तिघांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक सचिन सानप यांनी दिली. या तरूणांनी भाजपाच्या प्रदेश पातळीवरील वरिष्ठ नेत्यांविरोधातही घोषणाबाजी केली. अटक केलेले कार्यकर्ते पंकजा मुंडे यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करत असले तरी त्यांचा पक्षाशी काही संबंध नसल्याचे भाजपाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

विधानपरिषद निवडणुकीसाठी पंकजा यांना डावल्याने समर्थक नाराज

भाजपाने विधानपरिषद निवडणुकीसाठी पंकजा यांना डावलत महिला मोर्चाच्या अध्यक्षा उमा खापरे यांना उमेदवारी दिली आहे. तसंच विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासह माजी मंत्री राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे आणि प्रसाद लाड या पाच जणांची उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र ऐनवेळी पंकजा मुंडे यांचं नाव वगळण्यात आल्याने समर्थक नाराज झाले असून आक्रमक झाले आहेत.