नांदेड : भाजपाची विभागीय बैठक तसेच अन्य कार्यक्रमांच्या निमित्ताने शनिवारी येथे आलेल्या पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकार्‍यांचे स्वागत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यपद्धतीवर टीका करणार्‍या पुस्तकभेटीने करण्यात आल्यानंतर सह संघटनमंत्री सतीश धोंड यांनी भाषणादरम्यान स्थानिक संयोजकांना खडसावल्याची माहिती बैठकीनंतर बाहेर आली. पक्षाच्या प्रमुख पदाधिकार्‍यांनी नंतर या माहितीला दुजोरा दिला.

भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश महामंत्री (संघटन) तसेच सह संघटनमंत्री सतीश धोंड, प्रदेश सरचिटणीस सुनील राणे, रवी अनासपुरे, मराठवाडा संयोजक नितीन काळे आदी प्रमुख पदाधिकारी शनिवारी येथे आले होते. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत नांदेड व अन्य तीन जिल्ह्यांतील पदाधिकार्‍यांची विभागीय बैठक येथील एका आलिशान हॉटेलच्या सभागृहात झाली. या बैठकीच्या आयोजनाची जबाबदारी भाजपाच्या नांदेड महानगर जिल्हा शाखेच्या काही पदाधिकार्‍यांनी स्वीकारली होती.

अलीकडच्या काळात नांदेडमध्ये राजकीय व अन्य कार्यक्रमांमध्ये निमंत्रित पाहुण्यांचे स्वागत पुस्तकभेटीने करण्याची प्रथा रुढ झाली आहे. त्यानुसार अजय जामवाल, सतीश धोंड आदी पदाधिकार्‍यांचे स्वागत ग्रंथभेट देऊन करण्यात आले. स्वागताच्या सोपस्कारात धोंड यांना डॉ.दत्तप्रसाद दाभोळकर यांचे ‘संघ समजून घेताना’ हे पुस्तक देण्यात आल्यामुळे ही बाब त्यांना चांगलीच खटकली. नंतर आपल्या भाषणात या मुद्यावर त्यांनी संयोजकांना खडसावले. या पुस्तकात संघाबद्दल किती वाईट लिहिले आहे हे तुम्हाला माहिती नाही का, असा सवाल त्यांनी केला. धोंड यांच्या या पावित्र्यामुळे उपस्थितांत अस्वस्थता पसरली होती, असे एका पदाधिकार्‍याने नंतर सांगितले.

भाजपा नेते खा.अशोक चव्हाण शुक्रवारी सायंकाळीच नांदेडमध्ये दाखल झाले; पण ते वरील विभागीय बैठकीस उपस्थित नव्हते. भाजपाच्या वरिष्ठ पदाधिकार्‍यांनी महानगराध्यक्ष आ.अमरनाथ राजूरकर यांच्या निवासस्थानी भेट दिली तेव्हा खा.चव्हाण तेथे उपस्थित होते. अजय जामवाल, सतीश धोंड यांच्याशी त्यांनी चर्चा केली.

नांदेड जिल्हा भाजपाच्या कार्यालयाच्या इमारतीचे बांधकाम मागील काळात ठप्प झाले होते. आता या इमारतीचे काम प्रगतीपथावर असून या बांधकामास अजय जामवाल व इतर पदाधिकार्‍यांनी स्थानिक नेत्यांसह शनिवारी सकाळी भेट दिली. याप्रसंगी खा.अशोक चव्हाण, खा.डॉ.अजित गोपछडे, जिल्हाध्यक्ष डॉ.संतुक हंबर्डे, चैतन्य देशमुख, किशोर स्वामी, प्रवीण साले प्रभृती उपस्थित होते.