नांदेड – नांदेड महानगराची स्थानिक स्वराज्य संस्था अमृतमहोत्सवी वर्षाकडे वाटचाल करत असताना या संस्थेत निवडणुकीद्वारे झालेल्या सत्तांतरामध्ये महापौर व उपमहापौरपदी भाजपाच्या कविता संतोष मुळे आणि दीपकसिंह रावत यांची निवड झाली आहे. त्यानंतर या दोन्ही नूतन पदाधिकार्‍यांचा पदग्रहण सोहळा खा.अशोक चव्हाण व अन्य पक्षनेत्यांच्या उपस्थितीत पार पडला.

गेल्या महिन्यात झालेल्या मनपा निवडणुकीमध्ये भाजपाने ८१ पैकी ४५ जागा जिंकून या मनपातील काँग्रेसची दीर्घकालीन परंपरा मोडून काढली. महापौर-उपमहापौर पदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे ४ तसेच एका अपक्षाचे मत आपल्या बाजूने वळवत भाजपाच्या वरील दोन्ही उमेदवारांनी काँग्रेस-वंचित आघाडी आणि एमआयएमच्या दोन्ही उमेदवारांचा पराभव केला. या प्रक्रियेत राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन नगरसेवक तटस्थ राहिले.

महापौर-उपमहापौर निवडीसाठी मंगळवारच्या विशेष सभेत पिठासन अधिकारी या नात्याने जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी संपूर्ण प्रक्रिया पार पाडली. त्यांना मनपा आयुक्त महेशकुमार डोईफोडे, नगरसचिव अजितपालसिंघ संधू व इतर अधिकार्‍यांनी साहाय्य केले. नियोजित सभा सुरू झाल्यानंतर निर्धारित मुदतीत कोणीही माघार न घेतल्यामुळे दोन्ही पदांसाठी हात उंचावून स्वतंत्रपणे मतदान घेण्यात आले.

आरंभी महापौरपदासाठी मतदान घेतले गेले. त्यात कविता मुळे यांच्या बाजूने ५० जणांनी हात उंचावून आपली मान्यता दर्शविली. उपमहापौर पदासाठी रावत यांनाही तितकीच मते मिळाली. दोन्ही पदांच्या उर्वरित उमेदवारांना त्यांच्या पक्षीय संख्याबळाइतकीच मते मिळाल्यामुळे वरील निवडणुकीत मतांची फाटाफूट टळली. मनपा सभागृहातील विशेष सभेची संपूर्ण प्रक्रिया पार पडल्यानंतर भाजपा-शिवसेना पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत मनपा परिसरात विजयोत्सव साजरा केला. नंतर खा.अशोक चव्हाण व इतर नेत्यांच्या उपस्थितीत वरील दोन पदाधिकार्‍यांचा पदग्रहण सोहळा पार पडला.

सेवाभाव जपणार – महापौर

मला मिळालेली खुर्ची ही पदासाठी नसून शहरातील जनतेच्या सेवेसाठी आहे. सेवाभाव जपत मी नांदेडच्या विकासासाठी प्रयत्नशील राहील. महापौर पदासाठी मला योग्य समजल्याबद्दल भाजपाच्या सर्व स्थानिक आणि वरिष्ठ नेत्यांची मी आभारी आहे. – कविता मुळे, महापौर

कनकदंडे सभागृह नेता !

महापौरपदी निवड झाल्यानंतर कविता मुळे यांनी मनपातील बहुमतातला पक्ष या नात्याने भारतीय जनता पार्टीचे अनुभवी नगरसेवक अ‍ॅड.महेश मारोतराव कनकदंडे यांची सभागृह नेता म्हणून नियुक्ती केली. मनपा अधिनियमातील तरतुदींनुसार ही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर या नियुक्तीच्या आपल्या पहिल्याच पत्रावर महापौरांनी स्वाक्षरी केली.