छत्रपती संभाजीनगर/ नांदेड/ कल्याण : मुंबई उच्च न्यायालयाच्या लिपिक पदासाठीच्या रविवारी घेण्यात आलेल्या टंकलेखन परीक्षेत ‘सर्व्हर डाऊन’सारखी समस्या उद्भवल्याने मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरसह नांदेड येथील केंद्रांवरील विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ उडाला. याखेरीज कल्याणमध्ये बाजार समिती आवारातील परीक्षा केंद्रांवर दिवसभर विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागला.
छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठवाड्यासह विदर्भातील जवळपास २९०० तर राज्यभरातून १३ हजार विद्यार्थी या परीक्षेसाठी बसले होते. या प्रकाराची माहिती मिळताच कॉक्रोच जनता पार्टीचे प्रमुख अभिजित दिपके हे गोंधळ उडालेल्या छत्रपती संभाजीनगरमधील सुराणानगरच्या केंद्रावरील विद्यार्थ्यांच्या भेटीसाठी दाखल झाले. या वेळी दिपके यांनी विद्यार्थ्यांसह ठिय्या आंदोलन करणार असून, जोपर्यंत जिल्हा न्यायाधीश येऊन पुन्हा परीक्षा घेण्याचा निर्णय घेणार नाहीत, तोपर्यंत येथून हलणार नाही, असा पवित्रा घेतला. शहरातील सुराणानगरसह सातारा परिसरातील केंद्रांवरही गोंधळ उडाल्याचे चित्र आहे. संगणकावरील पटल पिवळा पडणे, टंकपट न चालणे आदी अडचणींचा सामना करावा लागल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली. तसेच ही परीक्षा पुन्हा घ्यावी, अशी भूमिका त्यांनी मांडली. या वेळी पोलीस उपायुक्त रत्नाकर नवले यांच्यासह त्यांच्या पथकाने विद्यार्थ्यांना शांत राहण्याचे आवाहन केले.
दरम्यान नांदेडमधील परीक्षार्थींकडूनही याबाबत तक्रार करण्यात आली. ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळाच्या केंद्रावरील प्रमुखांना विद्यार्थ्यांनी जिल्हा प्रमुख न्यायाधीशांच्या नावे एक निवेदन दिले.
कल्याणमध्ये परीक्षार्थींना फटका
कल्याणमधील कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील एका खासगी परीक्षा केंद्रावर रविवारी सकाळी गेल्या काही महिन्याच्या काळात तिसर्यांदा गोंधळ उडाला. या केंद्रावर रविवारी सकाळी १० वाजता परीक्षा होती. ही परीक्षा वेळेत सुरू होत नसल्याने केंद्राबाहेर जमलेल्या विद्यार्थी, पालकांनी गोंधळ घातला. विद्यार्थ्यांनी केंद्रात प्रवेश केल्यानंतर त्यांना निश्चित केलेल्या अनुक्रमांकाच्या संगणकासमोर बसण्याचे आवाहन करण्यात आले, त्या संगणकासमोर अगोदरच काही परीक्षार्थी बसले होते. त्यामुळे परीक्षार्थी मिळेल त्या संगणकासमोर बसले. परीक्षा उशिरा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ मिळाला नाही. परीक्षा गैरव्यवस्थापनामुळे सकाळच्या पहिल्या तुकडीचे विद्यार्थी केंद्रातून बाहेर पडले नाहीत. त्यानंतरच्या दोन सत्रांमधील विद्यार्थ्यांना वेळेत परीक्षा देता आली नाही. सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कल्याण केंद्रावर गोंधळ सुरू होता. न्यायालयाशी संबंधित वरिष्ठ परीक्षा केंद्राच्या ठिकाणी दाखल झाले होते. कल्याण पूर्वच्या आमदार सुलभा गायकवाड यांनीही परीक्षा केंद्राच्या ठिकाणी भेट दिली.
कल्याण केंद्रावर रायगड, नाशिक, मुंबई, पालघर जिल्ह्यातून विद्यार्थी आले होते. काही विद्यार्थी परीक्षा न देताच निघून गेले. या परीक्षेसाठी एक हजार रुपये शुल्क होते. या परीक्षेसंदर्भात परीक्षा केंद्राच्या नियंत्रकाला अनेक वेळा संपर्क केला, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
१३ हजार विद्यार्थी : मुंबई उच्च न्यायालयाअंतर्गत नागपूर, औरंगाबाद खंडपीठातील (बीएचसी-बॉम्बे हायकोर्ट) तेराशे पदांसाठी १३ हजार विद्यार्थी पात्र ठरले होते. सकाळ, दुपार व सायंकाळ, अशा तीन सत्रांत ही परीक्षा पार पडली. यातील सकाळी १० ते ११.१५ या सत्रातील परीक्षेत हा गोंधळ उडाला. छत्रपती संभाजीनगरमध्ये २९०० विद्यार्थी वेगवेगळ्या केंद्रांवर दाखल झाले होते.
या केंद्राचा बाजार समितीशी कोणताही संबंध नाही. ते केंद्र फक्त बाजार समितीच्या आवारात आहे. हे केंद्र खासगी आहे. हे केंद्र व्यवस्थित चालविता येत नसेल तर ते बंद करा यासाठी बाजार समिती प्रशासनाने या केंद्र चालकाला यापूर्वी तीन नोटिसा दिल्या आहेत. – रवींद्र घोडविंदे, सभापती, कल्याण बाजार समिती
