दरवाढ, माल पुरवठय़ाच्या प्रश्नामुळे खोके निर्मिती उद्योजक अडचणीत

साहित्याच्या दरात ३० ते ३५ टक्के वाढ

साहित्याच्या दरात ३० ते ३५ टक्के वाढ

औरंगाबाद : पुठ्ठय़ांचे खोके, लहान डबे तयार करण्यासाठी लागणारा माल वेळेत उपलब्ध होत नाही. त्यातही आता ३० ते ३५ टक्के दरवाढ झाली आहे. त्याला इंधनदरवाढीचेही एक कारण आहे. शिवाय गावी गेलेला परप्रांतीय कामगारही पुन्हा परतलेला नाही. परिणामी खोके, वेष्टण निर्मिती करणाऱ्या कंपन्यांसमोर मोठय़ा अडचणी उभ्या राहिल्या आहेत.

औरंगाबादेतील वाळूज, रांजणगाव या औद्योगिक परिसरात पुठ्ठय़ांच्या डब्यांची निर्मिती करणाऱ्या साधारण लहान-मोठय़ा २० कंपन्या आहेत. मिठाईच्या दुकानातील पेढे, बर्फी, लाडूसह इतरही पदार्थाच्या वेष्टण, छोटी खोकी तयार करण्यासाठी लागणारा डय़ुप्लेक्स पेपर, लॅमिनेशनचे रोल, क्राफ्ट, अशा साहित्याच्या दरात ३० ते ३५ टक्के दरवाढ झालेली आहे. शिवाय बऱ्याचवेळा मालही उपलब्ध होत नाही. डय़ुप्लेक्स पेपर जळगाव, मुंबई येथून मागवावा लागतो. त्याच्या रोलचा दर सध्या ५५ रुपये प्रति किलोने आहे. गत टाळेबंदीच्या काळात हा दर ४० रुपये किलोच्या आत होता. लॅमिनेशन रोलचे दर पूर्वी १७० ते १७५ रुपये किलोपर्यंत होते. आता २७० ते २८० रुपये किलोपर्यंत दर वाढलेले आहेत. कोरोगेशनच्या पेपरला क्राफ्ट लागतो. त्याचेही दर ३० टक्क्य़ांनी वाढले. पॅकिंग इंडस्ट्रिजमध्ये बहुतांश मध्यप्रदेशातील कामगार वर्ग आहे. गतवर्षीच्या टाळेबंदीत अनेक कामगार गावी गेलेले आहेत. त्यातील २५ टक्केच कामगार पुन्हा परतलेला आहे, असे पॅकिंग कंपनीचे संचालक रवींद्र पाटील यांनी सांगितले.

फरसाण, वेफर्सच्या दरातही वाढ

मिठाई दुकानातील फरसाण, शेव, चिप्स, केळी चिप्स या मसालेदार पदार्थासह पेढे, बर्फी, लाडूच्या पॅकिंगसाठी लागणाऱ्या डब्यांच्याही दरात वाढ झालेली आहे. नमकिन पदार्थाच्या दरात किलोमागे ३० ते ४० रुपयांची वाढ झाली आहे. तेल, गॅस सिलिंडरसह पदार्थ बंदिस्त करून विक्री करण्यात येणाऱ्या डब्यांच्या साहित्याच्याही दरात झालेल्या वाढीचा परिणाम आहे. बेसनपीठ व गॅससिलिंडरचे दर २० टक्क्य़ांनी वाढले आहेत. १५ किलो तेलाचा डबा पूर्वी बाराशे ते पंधराशे रुपयांना मिळायचा. आता त्याचा दर बावीसशे रुपयांपर्यंत पोहोचलेला आहे. लहान व्यापाऱ्यांना दरवाढीशिवाय पर्याय नाही. आम्ही मोठय़ा व्यापाऱ्यांनी अद्याप तरी दरवाढीचा विचार केला नाही. पण दरवाढीचा विचार करावा लागेल.

– राजू पवार, मिठाई व्यापारी.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व औरंगाबाद बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Box manufacturing entrepreneurs in trouble due to price hike supply problem zws

Next Story
video : रक्तस्त्राव ‘तिला’ रोखू शकत नाही !