छत्रपती संभाजीनगर – राज्यात प्रत्येक जिल्ह्यात परशुराम भवनची उभारणी करण्यात येणार आहे. कल्याण-डोंबिवलीमध्ये परशुराम भवनसाठी जागा ताब्यात घेतली असून, त्याचे भूमिपूजनही पार पडले आहे.
वेदाध्यन, पौरोहित्य शिकणाऱ्या वेदोपासकांना (विद्यार्थी) शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. तर पौरोहित्य करणाऱ्यांना विमा कवच आणि निवृत्ती वेतनही देण्याचाही प्रयत्न असल्याचे सांगत परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष कॅप्टन आशिष दामले यांनी महामंडळाच्या माध्यमातून महिलांसाठी २० लाखांपर्यंतचे कर्ज देणारी रमाबाई रानडे बचतगट अर्थसहाय्य योजना राबवण्यात येणार असल्याची माहिती शुक्रवारी येथे दिली.
अलिकडच्या काळात जे १७ ते १८ महामंडळे स्थापन झाली त्यातील तातडीने अध्यक्ष मिळालेले आणि कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा मिळालेले परशुराम महामंडळ एकमेव असल्याचा दावाही कॅ. दामले यांनी केला.
मराठवाडा दौऱ्यावर आलेले कॅ. दामले यांचा शुक्रवारी सकाळी पिसादेवी येथे सकल ब्राह्मण वर्गाच्या वतीने सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमादरम्यान आणि नंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी वरील माहिती दिली. महामंडळाच्या विविध योजना तयार करण्यात येत असून, त्यामध्ये वैयक्तिक स्वरुपातील १५ लाखांपर्यंतच्या कर्जाचा व्याज परतावा, ५० लाखांच्या गटकर्जाचा व्याज परतावा देण्याचा समावेश आहे.
विभाग आणि जिल्हानिहाय उभारण्यात येणाऱ्या परशुराम भवनमध्ये आर्थिक परिस्थिती जेमतेम असणाऱ्या समाजातील वर्गाला मौंज, लग्नकार्य करता येणार आहे. समाजातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुरू करण्यात येणार आहे. याशिवाय केंद्रीय लोकसेवा आयोग व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची तयारी करणारे शिक्षण केंद्र (स्टडी सेंटर), महिला बचतगटांना मार्गदर्शन करणारे केंद्र, गोशाळा, अशी रचना परशुराम भवनची राहणार असल्याचेही कॅ. दामले यांनी सांगितले.
पिसादेवीतील पारदेश्वर मार्गावरील कुलकर्णी लाॅन्स येथे आयोजित पार पडलेल्या कार्यक्रमात भारती देशपांडे यांची भारतीय जनता पार्टीच्या महिला माेर्चाच्या शहर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. व्यासपीठावर कीर्तनकार विनोद ‘कृष्ण’ शास्त्री नायगव्हाणकर, जिल्हा परिषद सदस्य आजीनाथ धामणे, माजी ग्रामपंचायत सदस्य मदन काळे, विलास कुलकर्णी यांची उपस्थिती होती.
पुण्यातील कार्यालयात आपण दर बुधवारी व गुरुवारी उपलब्ध असल्याचे कॅ. दामले यांनी सांगितले. समाजाच्या ज्या काही मागण्या आहेत त्यावर विचार केला जाईल. पिसादेवी येथेही परशुराम भवन उभारण्याविषयी विचार केला जाईल, असेही कॅ. दामले म्हणाले.
