मंत्रिमंडळ दौऱ्यामुळे नोकरशाही अस्वस्थ!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अख्खे मंत्रिमंडळ बीड, लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्य़ांच्या दौऱ्यावर येत असल्याने प्रशासकीय यंत्रणेवर मोठा ताण पडणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अख्खे मंत्रिमंडळ बीड, लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्य़ांच्या दौऱ्यावर येत असल्याने संपूर्ण विभागातील प्रशासकीय यंत्रणेवर मोठा ताण पडणार आहे. या दौऱ्यात नोकरशाहीला लक्ष्य केले जाण्याच्या शक्यतेमुळे त्यांच्यामध्ये अस्वस्थता आहे.
मुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळाने मराठवाडय़ातील दुष्काळ पाहणीसाठी केवळ तीन जिल्ह्य़ांची निवड केली. त्यामुळे नांदेड, परभणी व हिंगोलीतील राजकीय वर्तुळात नाराजी पसरल्याचे आधीच समोर आले. आता प्रशासकीय यंत्रणेतील अस्वस्थता पुढे येत आहे. अख्खे मंत्रिमंडळ दुष्काळ पाहणीसाठी दोन-तीन जिल्ह्य़ांमध्ये जाण्याची राज्याच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ होय. हा निर्णय मुंबईत घेण्यात आल्यानंतर बुधवारपासून प्रशासकीय यंत्रणेची धावपळ सुरू झाली.
मंत्री व राज्यमंत्र्यांना तीन जिल्ह्य़ातील एक तालुका नेमून दिल्यानंतर त्यांची व त्यांच्यासोबत राहणाऱ्यांची वाहन-निवास व्यवस्था याचे नियोजन वरील तीन जिल्ह्य़ांच्या प्रशासनास करावे लागले. इतर जिल्ह्य़ातील शासकीय वाहने वरील जिल्ह्य़ांमध्ये पाठविण्यात आली आहेत. नांदेडमधून ३ गाडय़ा लातूर जिल्हा प्रशासनाकडे पाठविण्यात आल्या, पण पोलीस वगळता अन्य मनुष्यबळ तेथे गेले नाही, असे स्पष्ट करण्यात आले.
मंत्री व राज्यमंत्र्यांना प्रत्येकी एक तालुका देण्यात आला असून, त्यांच्यासोबत दौऱ्यात तहसीलदार व इतर विभागांचे तालुकास्तरीय अधिकारी सहभागी होतील, असे नियोजन आहे. तहसीलदार, गटविकास अधिकारी यांना शासकीय वाहन उपलब्ध असल्याने दौऱ्यात त्यांची अडचण नाही. पण प्रत्येक मंत्र्यासोबत माहिती खात्याचा अधिकारी कसा उपलब्ध करून द्यायचा, असा पेच या विभागाच्या प्रशासनासमोर असल्याचे दिसून आले. त्यावर तोडगा म्हणून जिल्हा माहिती अधिकाऱ्यांनी आपापल्या जिल्ह्य़ातील तहसीलदारांच्या संपर्कात राहून मंत्र्यांच्या दौऱ्यातील ठळक बाबींची नोंद घ्यावी, अशी व्यवस्था करण्यात आली आहे.
कोणताही मंत्री दुष्काळी दौऱ्यावर गेल्यानंतर होणाऱ्या आढावा बैठकीत सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या लोकप्रतिनिधींकडून नोकरशाही कामच करीत नसल्याची तक्रार केली जाते. या पाश्र्वभूमीवर तीन जिल्ह्य़ांमध्ये अख्खे मंत्रिमंडळ येत असताना महसूल, कृषी, ग्रामविकास, पाणीपुरवठा व अन्य काही विभागांच्या अधिकाऱ्यांविरोधात तक्रारींचा पाऊस पडण्याची शक्यता असल्याने या दौऱ्याबद्दल नोकरशाहीत मोठी अस्वस्थता असल्याचे निरीक्षण एका अधिकाऱ्याने नोंदविले.
पुढच्या टप्प्यात मुख्यमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळ नांदेड, परभणी व हिंगोली जिल्ह्य़ांना भेटी देणार काय, ते अजून स्पष्ट झाले नसले, तरी मुख्यमंत्र्यांनी याच दौऱ्यात लातूरऐवजी विभागीय मुख्यालयाच्या ठिकाणी सर्व जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पाचारण करून संपूर्ण विभागाचा आढावा घेतला असता, तर ते अधिक सुसंगत ठरले असते, असाही सूर निघाला.
पंकजा मुंडे गेवराईहून दिल्लीकडे?
लातूरच्या आढावा बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांसह बहुसंख्य मंत्री रात्रीतून रेल्वेने मुंबईस परतणार आहेत. मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस प्रथमच मराठवाडय़ातून रेल्वेने प्रवास करणार आहेत. दरम्यान, लातूरच्या पालकमंत्री पंकजा मुंडे गेवराईत दुष्काळ पाहणी केल्यानंतर औरंगाबादमार्गे दिल्लीस प्रयाण करणार असल्याचा आधीचा दौरा होता. मात्र, त्यामुळेच अधिकाऱ्यांत संभ्रम निर्माण झाला आहे. लातूरच्या पालकमंत्री असलेल्या मुंडे लातूर येथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या आढावा बैठकीला उपस्थित राहणार की नाही, असा प्रश्न संध्याकाळी उशिरापर्यंत निर्माण झाला होता. मुंडे यांच्या कार्यालयाकडून सुधारित दौरा पाठविण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. मात्र, हा सुधारित दौरा उशिरापर्यंत पाठविण्यात आला नसल्याची माहिती मिळाली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Cabinet tour bureaucracy disturbed