सुहास सरदेशमुख

औरंगाबाद : उन्हाळय़ात मद्यप्रेमींची सर्वाधिक तहान बिअर भागवते. यंदाचा उन्हाळा गेल्या काही वर्षांतील विक्रमी मानला जात असला, तरी गेल्या वर्षी ऐन उन्हाळय़ात करोनाच्या दुसऱ्या लाटेने केलेल्या कोंडीची भरपाई प्यालेवीरांनी यंदा केलेली दिसून येत आहे. गेल्या वर्षीच्या एप्रिल व मे महिन्याच्या तुलनेत मराठवाडय़ातून उत्पादन करणाऱ्या सहा प्रमुख बिअर उत्पादक कंपन्यांनी त्यांच्या उत्पादनात तब्बल १८३ टक्के वाढ केली तर विक्रीमध्ये २५२ टक्क्यांनी वाढ दिसून आली. उत्पादन वाढलेले असतानाही वाहतुकीमुळे अनेक ठिकाणी बिअरचा तुटवडा भासू लागला आहे. काही ब्रॅन्डची चणचण असल्याचे विक्रेतेही सांगतात. 

करोनामुळे राज्य उत्पादन शुल्क तसे घसरलेले होते. पण या वर्षीचा उन्हाळा बिअर विक्रीतील विक्रमी म्हणता येईल. उन्हाचा पारा ४५ अंशांवर जात असल्याने बिअरची मागणी वाढत गेली. गेल्या वर्षांच्या तुलनेत एप्रिल व मे महिन्यातील आजवरची आकडेवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाने एकत्रित केल्यानंतर यंदाचा विक्रम समोर आला. २०२०-२१ मधील मे महिन्यातील बिअर विक्री ६३ लाख लिटर होती, ती या मे महिन्यात तब्बल २४८ लाख ४५ हजार लिटरवर पोहोचली. टक्केवारीत दोन वर्षांची तुलना केली असता ती तब्बल २९४ टक्के भरते. या सगळय़ाचा परिणाम आता बाजारपेठेवर झाला असून अनेक ब्रॅन्डची बिअर उपलब्ध नाही, असे विक्रेते सांगत आहेत. बिअरबार मालक व ठोक विक्रेत्यांकडे येणारा माल आणि मागणी यातील फरक असल्याने जी मिळेल ती घ्या, असेही ग्राहकांना सांगण्यात येत आहे. या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागात नव्याने रुजू झालेले अधीक्षक एस. टी. झगडे म्हणाले, ‘काही ब्रॅन्डची चणचण असल्याचे समजले आहे. पण उत्पादन आणि विक्रीत एप्रिल व मे महिन्यात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे एप्रिल व मे महिन्यातील महसूलही ४०३ कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे. महसुलातील ही वाढ तुलनेने अधिक आहे.’

महसूल असा..

करोनामुळे मद्यविक्रीलाही गेल्या वर्षी फारशी मागणी नव्हती. त्यामुळे महसूलही घसरलेला होता. २०२०-२१ मध्ये ५० कोटी ८३ लाख रुपयांचा महसूल या वर्षी ४५३ कोटी ८३ लाख रुपयांवर गेला आहे. त्यामुळे आता काही ब्रॅन्डची चणचण जाणवू लागली आहे.

अबब.. केवढी वाढ..

गेल्या वर्षी २०२१ मध्ये मे महिन्यात केवळ ५९.४२ लाख लिटर बिअर उत्पादन झाले होते. या वर्षी २१४ लाख ६६ हजार लिटर बिअर उत्पादित झाली. निर्मितीमधील ही वाढ तब्बल ३६१ टक्के एवढी आहे. तर विक्रीतील एप्रिल व मे महिन्यातील वाढ तब्बल २५२ टक्के एवढी आहे.

दोन महिन्यांतील

उत्पादन वाढ  (टक्क्यांमध्ये)

यु बी. मिलिनिअम   १५१

यु.बी. अजिंठा ४४७

काल्सबर्ग   २४०

ए.बी.एन ६७

लिलासन्स इंड   १२२

फोस्टर ए.बी.एन. १५८