सुहास सरदेशमुख

औरंगाबाद : भारत जोडो यात्रेत उत्साह आणि उत्सवप्रियता अधिक दिसून येत असून प्रश्नांचा ऊहापोह आणि राज्यातील काँग्रेसच्या संघटनात्मक संरचनेबाबत फारशी चर्चा होताना दिसून येत नसल्याचे निरीक्षण काँग्रेस कार्यकर्ते आणि नेतेही आता आवर्जून नोंदवू लागले आहेत. गेल्या नऊ दिवसांपासून नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रेमुळे राहुल गांधी यांची भाजपने घडविलेल्या प्रतिमेतून ते आता पूर्णत: बाहेर पडत असल्याचे चित्र तरी दिसते. 

Difference Between Congress And BJP Manifestos Sankalp patra Nyay Patra
काँग्रेसच्या ‘महालक्ष्मी योजने’ला भाजपाकडून ‘लखपती दीदी’चं प्रत्युत्तर; काय आहेत जाहीरनाम्यात महिलांसाठीच्या योजना
Neelam Gorhe criticize Uddhav Thackeray said he has lost his base politically
“उद्धव ठाकरे यांचा राजकीयदृष्ट्या जनाधार संपला,” निलम गोऱ्हे यांची टीका; म्हणाल्या…
sangli
सांगलीच्या निर्णयाने कार्यकर्ते अस्वस्थ; निवडणुकीवर बहिष्कार अथवा बंडखोरीची मागणी
ajit pawar and supriya sule
“संसदेत भाषणं करून मतदारसंघाचे प्रश्न सुटत नाहीत”, अजित पवारांचे सुप्रिया सुळेंवर टीकास्र; म्हणाले, “माझी पट्टी लागली तर…”

  राष्ट्रीय प्रश्नांवर राहुल गांधी चर्चा करत असले तरी राज्या-राज्यांतील प्रश्नांकडे अधिक सहजतेने बघितले जात आहे का, याविषयी शंका घेतल्या जात आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी उद्योगांचा पळवापळव या विषयावर त्यांच्याबरोबर चर्चा केली, विशेषत: गुजरात निवडणूकपूर्वी वेदांता फॉक्सकॉन व वैद्यक उपकरणनिर्मितीचे कारखाने गुजरातला कसे नेले गेले, याची माहिती त्यांनी राहुल गांधी यांना दिली. राज्यस्तरीय प्रश्न सहकार विभागात दडले आहेत आणि त्या अडचणींवर  कशी मात करायची अशी चर्चाही सहकार क्षेत्रातील काही मंडळींनी राहुल गांधी यांच्याबरोबर  केली. साखर कारखानदारांचे प्रश्न जयप्रकाश दांडेगावकर यांनी मांडले. याशिवाय प्रश्नाचा ऊहापोह मात्र चर्चेत आला नाही. हिंगोली जिल्ह्यात साहित्यिकांबरोबरही चर्चा झाली. मात्र राज्याचे प्रश्न आणि त्यावर राज्य सरकारने काय करावे किंवा त्यांच्या उणिवा दाखविणाऱ्या बाबींवर राज्यातील नेत्यांनी प्रकाश टाकणारी वक्तव्ये फारशी केली नाही. त्यामुळे संघटनात्मक पातळीवर यात्रेदरम्यान फारसे काही घडले नाही. नांदेड जिल्ह्यात काँग्रेसचा दबदबा होता आणि आहे. त्यात नेते अशोक चव्हाण यांनी त्यांच्याविषयी निर्माण झालेले संभ्रमाचे मळभ दूर करून घेतले. त्यांची काँग्रेसचे नेते अशी प्रतिमा अधिक उजळली. हिंगोली जिल्ह्यात राहुल गांधी यांच्याबरोबर काम करणारे दिवंगत नेते राजीव सातव यांचाही प्रभाव होता. मात्र यात्रा मार्गावर असलेल्या अन्य जिल्ह्यांतून काँग्रेसच्या संघटनात्मक रचनांमध्ये काही बदल होऊ शकतील का, याविषयी फारशी चर्चा झाली नाही. नांदेड जिल्ह्यात लातूरचे आमदार अमित देशमुख दिसले नाहीत. बीडच्या रजनीताई पाटील यांचा प्रभाव बीड जिल्ह्यात नव्हताच. त्यांनी महिलांचे संघटन उभे करण्यासाठी काही केले का, हाही प्रश्न अनुत्तरितच आहे. उस्मानाबाद, औरंगाबाद या जिल्ह्यातील नेत्यांनी व काही निवडक कार्यकर्त्यांनी भारत जोडोमध्ये हजेरी लावली खरी, मात्र आगामी निवडणुकांसाठी यात्रेमुळे किती आणि कोणते बदल होतील याची उत्तरे अद्यापही मिळालेली नाहीत.

माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण यांनी भारत जोडो यात्रेत हजेरी लावली. बाळासाहेब थोरात यांनी यात्रेचे समन्वयही चांगले केले. पण त्याचा निवडणुकांच्या राजकारणावर कसा आणि किती परिणाम होईल, हे अजूनही गुलदस्त्यातच आहे. यात्रा मार्गावर जिल्ह्यात मात्र उत्साह आणि उत्सवप्रियता अधिक असल्याचे दिसून येत आहे. हिंगोली जिल्ह्यात स्वागताला हत्ती होता. ४८ तास मेहनत करून १० हजार चौरस फुटांवर एका कलाकाराने रांगोळीही काढली. राहुल गांधींनी कुस्त्या पाहिल्या, ढोल हातात घेतला. सामान्यांच्या गळाभेटी घेतल्या. त्यामुळे उत्साह आणि उत्सवप्रियतेमुळे पायी चालत जाणाऱ्यांची संख्या आणि गर्दीची छायाचित्रेही आली. सामान्यांनी बेरोजगारी, महागाई, हे प्रश्नही राहुल गांधी यांच्यापर्यंत थेटपणे मांडले. पण त्याचा राजकीय लाभ कसा घ्यायचा आणि त्याची सुरुवात कधीपासून या प्रश्नांची उत्तरे काँग्रेसच्या जिल्हापातळीवरील नेत्यांनाही मिळालेली नाहीत. मात्र हैदराबाद मुक्ती संग्रामाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षांत कॉग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांनी अभिवादन केले. ज्या सुविधा कॉग्रेसने दिल्या त्याचा वापर करून पक्षाची होणारी बदनामी करणाऱ्या मध्यमवर्गास त्यांनी कानपिचक्या दिल्या. त्यामुळे कॉग्रेसची विचारधारा स्पष्टपणे पुन्हा जनतेपर्यंत पोहोचविली जात असताना संघटनात्मक संरचना आणि त्यातील शक्तिस्थळे आणि त्रुटींवर मात्र चर्चा होत नसल्याचे सांगण्यात येत आहे.