छत्रपती संभाजीनगर: नागपूरमध्ये भाजप नेत्यांनी डोक्यावर गोल टोपी घालून दिलेल्या शुभेच्छा चालतात मग आम्ही आमच्या पक्षात घेतलेले मुस्लिम कार्यकर्ते का चालत नाहीत, असा प्रश्न शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी जाहीरपणे विचारल्यानंतर ईदला शुभेच्छा देण्यास कोणाचीच हरकत नाही, असं वक्तव्य केले आहे भाजपचे नेते आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी.

कामठीसारख्या मतदारसंघात ३९ हजाराहून अधिक मुस्लिम मतदार आहेत. त्यातील काही जण तर भाजपला मतदान करत असतील. सगळे करणार नाहीत. पण त्यांनी ईदला बोलावले आणि त्यांना शुभेच्छा दिल्या तर काय हरकत आहे. आमचा विरोध क्रिकेटचा सामना पाकिस्तानने जिंकल्यावर फटाके फोडणाऱ्या मुस्लिमांना आहे. लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात ३१ जागांवर निवडून आलेल्या उद्धव ठाकरे यांच्या समर्थक खासदारांच्या मतदारसंघातील विजयी मिरवणुकीमध्ये पाकिस्तानचे झेंडे फडकवले गेले. त्यावर आमचा आक्षेप आहे.

मराठवाड्यात धाराशिव जिल्ह्यात ओम राजेनिंबाळकर आणि परभणीमध्ये संजय जाधव यांच्या मतदारसंघात हे पहावयास मिळाले होते. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये विजयी झाल्यानंतर कॉग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांनी काय पद्धतीने जल्लोष केला होता हे आम्ही पाहिले आहे, असा युक्तीवाद करत बावनकुळे यांनी ईदच्या शुभेच्छा देण्यास जाणे चुकीचे कसे असेल, असा प्रश्न केला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेकडून रशीद मामू यांच्या प्रवेशामुळे निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. 

 छत्रपती संभाजीनगरच्या निवडणुकीत एमआयएमकडून जातीय दंगली निर्माण होतील असे वातावरण निर्माण केले जात असल्याच्या शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या नेत्याच्या वक्तव्याशी आपण सहमत असून तसे असेल तर आम्हीही गप्प बसणार नाही, असेही ते एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले. मात्र रशीद मामू यांच्या प्रवेशामुळे निर्माण केल्या जाणाऱ्या प्रचार मुद्द्यात नागपूरमधील छायाचित्रे पुढे आल्यानंतर हा मुद्दा ईदच्या शुभेच्छापर्यंत पुढे सरकला आहे.